रोहा रेल्वेफाटकाचा खांब मोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:14 AM2020-01-03T00:14:53+5:302020-01-03T00:14:57+5:30

सुदैवाने अनर्थ टळला; प्रवासी, वाहनचालक खोळंबले

Roha Railway Pillar | रोहा रेल्वेफाटकाचा खांब मोडला

रोहा रेल्वेफाटकाचा खांब मोडला

Next

रोहा : शहरात असलेल्या रेल्वेफाटकाचा खांब गुरुवारी अचानक मोडून खाली पडला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रवासी व वाहनचालक चांगलेच खोळंबले. मोडून पडलेला खांब हलविण्यात आल्यानंतर या मार्गावरून रहदारी सुरू झाली. फाटकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी सिटीझन्स फोरमचे अध्यक्ष नितीन परब यांनी केली आहे.

रोहा रेल्वे स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रोहा-नागोठणे या राज्यमार्गावर डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालयाजवळच असलेले रेल्वे फाटक अचानक तुटून खाली पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी रेल्वे प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला होता. वाहनचालकांनी आपल्या गाडीचा हॉर्न वाजवत फाटकातील कामगाराला बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही तेथे काम करणारा कामगार बाहेर आला नाही. शेवटी रोहा स्टेशनवरून स्टेशन सहायक प्रबंधक व त्यांची टीम धावत पळत रेल्वे फाटकापर्यंत आली आणि हा मोडलेला अधांतरी लोखंडी आडवा खांब बाजूला केला, तेव्हा प्रवाशांची सुटका झाली. त्या दरम्यान एक जलद रेल्वे गाडी रुळावरून पास झाली. रेल्वे प्रशासनाने या रेल्वे फाटकाकडे वेळोवेळी लक्ष देणे व त्यांचे मेंटनन्स करणे गरजेचे आहे.

मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने या रेल्वेफाटकाजवळ वाहनचालक व प्रवासी यांचा नेहमीच खोळंबा होत असतो. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीमुळे ही घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी फाटकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणाºयांवर रेल्वेने कारवाई करावी, अशी मागणी सिटीझन्स फोरमचे अध्यक्ष नितीन परब यांनी केली आहे.

प्रत्येक सप्ताहामधील सोमवारी आॅनड्युटी स्टेशन मास्तर, गेटमॅन व सिग्नल विभाग या फाटकाची तपासणी करतात. यामध्ये काही दुरुस्त्या असल्यास त्या करून घेतल्या जातात.
-आर.जे. मीना, रेल्वे स्टेशन प्रबंधक, रोहा

रेल्वेफाटकाला वाहनचालकाचा चुकून धक्का लागल्यास त्याच्यावर रेल्वेकडून गुन्हा दाखल करून दंड वसूल केला जातो. मात्र, आजच्या या घटनेमुळे उभे असलेले उघडलेले फाटकाचे खांब पडत असतील तर ते वाहनचालकांसाठी धोकादायक आहेत. आता या घटनेमुळे संबंधित अधिकाºयांवर रेल्वे प्रशासन गुन्हा दाखल करेल का?
- महेंद्र मोरे, रहिवासी

Web Title: Roha Railway Pillar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.