रोहा उपजिल्हा रुग्णालयास सुविधा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:39 AM2020-02-19T01:39:38+5:302020-02-19T01:39:43+5:30

तातडीने पूर्तता करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश : मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत बैठक

Roha sub-district hospital will be facilitated | रोहा उपजिल्हा रुग्णालयास सुविधा मिळणार

रोहा उपजिल्हा रुग्णालयास सुविधा मिळणार

Next

रोहा : रोहा उपजिल्हा रुग्णालयाविषयीच्या रोहेकरांच्या भावना लक्षात घेत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मार्चच्या पहिल्या आठवड्यात याबाबत मंत्रालयस्तरावरील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे मान्य केले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांना रोहा उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्यांची माहिती देऊन बैठकीपूर्वी जे विषय निकालात निघू शकतात त्याची तातडीने पूर्तता करण्याचे आदेश पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

रोहेकरांनी विशेषत: युवकांनी पुन्हा एकदा उठाव करत रोहा उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न हातात घेतला असून याबाबतची बैठक रविवारी विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत रोहा ग्रामीण रुग्णालयाच्या सेवांबाबतच्या सद्य:स्थितीवर चर्चा झाली. रोह्यातील वैद्यकीय सेवा प्रभावित होण्यामागची कारणे पाहताना रोहा उपजिल्हा रुग्णालयातील बहुतांशी पदे रिक्त असल्याने खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून आले. तसेच हा ताण क्षमतेबाहेरचा असल्याने रोह्यातील वैद्यकीय व्यावसायिकही सेवा देताना पुरेसा न्याय देत नसल्याची खंत रोहेकरांनी मांडली.
यावर बैठकीत चर्चा होऊन रोशन चाफेकर, स्वप्निल धनावडे,
अरुण साळुंखे, चेतन कोरपे, समीर दळवी, विक्रम जैन, आशिष शहा, भालचंद्र पवार यांचा एक गट याबाबत पूर्ण माहिती घेऊन त्या आधारावर खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकिता खैरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाहीची मागणी करण्याचे ठरले होते. त्यानुसार सोमवारी पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांना रोशन चाफेकर, स्वप्निल धनावडे, पराग फुकणे, अरुण साळुंखे, चेतन कोरपे आदींनी निवेदन दिले.

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी लगेचच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांच्याशी संपर्क साधून रोहा उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांची माहिती घेऊन ती भरण्याबाबत काय करता येईल याचा प्रस्ताव करण्यास सांगितले. तसेच रोहा उपजिल्हा रुग्णालयात श्वानदंश, विंचुदंश व सर्पदंश यावरील औषधे योग्य त्या प्रमाणात तातडीने अलिबाग जिल्हा रुग्णालयातून पाठवण्याचे आदेश दिले. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर डॉक्टर उपलब्ध नसतात या प्रश्नी संबंधित एजन्सीच्या माध्यमातून कंत्राटी डॉक्टर उपलब्ध करून देण्यास सांगितले. तसेच रोहा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिससह अन्य उपकरणे उपलब्ध करण्यासाठी मागील निर्णयाची सद्य:स्थिती कळवण्यास सांगितले. रोह्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या आरोग्य दक्षता समितींचे पुनर्गठण लवकरात लवकर करण्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मान्य केले.

च्रोहा उपजिल्हा रुग्णालयातील बहुतांशी पदे रिक्त असल्याने डॉक्टर नाहीत, या कारणास्तव खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याचे
तरु णांचे म्हणणे आहे.
 

Web Title: Roha sub-district hospital will be facilitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.