अलिबाग : रोह्याचे माजी नगराध्यक्ष, तसेच रोहा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दिलीप राजे (६७), यांचे गुरुवारी सकाळी पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून व जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.रोहा शहरातील विविध सामाजिक संघटना व संस्थांमध्ये समरसून काम करताना शहराकरिता त्यांनी वेळोवेळी बहुमूल्य योगदान दिले. राजकारणात असले तरी त्यांचा मूळ पिंड पत्रकारितेचाच होता. अखेरच्या श्वासापर्यंत ते पत्रकारितेत रमले होते. रायगड जिल्ह्यातील अनेक वर्तमानपत्रांत समग्र लिखाण करत असतानाच रोहा शहराच्या विविध समस्या त्यांनी सामर्थ्यशाली लेखणीद्वारे मांडल्या, त्यांनी मांडलेल्या समस्यांची शासकीय व प्रशासकीय पातळीवर दखल घेतली जावी, यासाठी त्यांनी पाठपुरावा करून समस्या सोडवण्यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असे.रोह्याचे नगराध्यक्ष म्हणून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ते सतत आग्रही राहात असत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी रोह्यातील अभूतपूर्व मूक मोर्चानंतर प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी आपल्या लेखणीतून खास शैलीत केलेले या मोर्चाचे वर्णन वाचनीय होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अगदी शेवटपर्यंत सर्वांच्या संपर्कात होते.दिलीप राजे यांचे निधन झाल्याचे समजताच पुण्यात, रुग्णालयात आणि त्यांचे पार्थिव रोहा येथे त्यांच्या निवासस्थानी आणल्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंतिमदर्शन घेतले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सुनील तटकरे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते, तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. रोहा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
रोह्याचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार दिलीप राजे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 6:35 AM