रोहेकर आज बंद पाळून करणार निषेध, १५६ वर्षांची परंपरा मोडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:58 AM2017-10-04T01:58:42+5:302017-10-04T01:58:54+5:30
येथील धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याला १५६ वर्षांची देदीप्यमान परंपरा आहे. या पालखी सोहळ्याला पहिल्यादांच पोलिसांनी आपली दंडेलशाही वापरून परंपरा मोडीत काढली आहे
रोहा : येथील धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याला १५६ वर्षांची देदीप्यमान परंपरा आहे. या पालखी सोहळ्याला पहिल्यादांच पोलिसांनी आपली दंडेलशाही वापरून परंपरा मोडीत काढली आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून रोहेकरांनी ४ आॅक्टोबरला शहरात उत्स्फूर्त बंद पाळून पोलीस प्रशासनाचा निषेध करीत मूक मोर्चाचे आयोजन के ले आहे.
रोहा शहराचे आराध्य दैवत असणारे धावीर महाराजांचा उत्सव नवरात्रौत्सवात हिंदू व मुस्लीम समाज मोठ्या एकोप्याने गेली १५६ वर्षे साजरा करीत आहेत. राज्यात दोन ठिकाणी पोलीस सलामी दिली जाते. त्यापैकी एक रोह्याचे धावीर महाराज मंदिर आहे. असे असतानाही रोहा पोलिसांनी पालखी सोहळा सुरू असताना पालखीसोबत पारंपरिक वाद्य वाजविण्यास बंदी केली. यामुळे गावातील वातावरण संतप्त झाले.
रोहेकर नागरिकांनी सोमवारी सायंकाळी येथील श्री विठ्ठल मंदिरात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला हिंदू - मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी संतप्त भावनांना वाट मोकळी केली. १५६ वर्षांत असा प्रसंग पालखी सोहळ्यात झाला नसून पोलिसांनी यंदा प्रथमच केलेल्या या दंडेलशाहीविरोधात बुधवारी रोहेकरांनी निषेध म्हणून मूक मोर्चा काढून रोहा बंदची हाक दिली आहे.