'रोहिदास’ला खडक लागला; सात जण सुखरूप; नौकेचे १५ लाखांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 11:38 AM2024-08-08T11:38:52+5:302024-08-08T11:40:43+5:30
या घटनेमध्ये या बोटीचे १५ लाखांचे नुकसान झाले आहे...
आगरदांडा : तालुक्यामधील राजपुरी कोळीवाड्यातील ४ सिलिंडरच्या यंत्रचलित मासेमारी नौकेला नांदवली दीपस्तंभ मणेरी खडकाजवळ अपघात झाला. यामध्ये नौका खोल समुद्रात बुडाली. बोटीवरील ७ जणांनी वेळीच समुद्रात उड्या घेतल्या. तसेच दुसरी बोट त्यांच्या मदतीला धावून आल्याने ते सर्वजण वाचले. दिगंबर नारायण चव्हाण यांच्या मालकीची रोहिदास बोट होती. या घटनेमध्ये या बोटीचे १५ लाखांचे नुकसान झाले आहे.
बुधवारी सकाळी ६ वाजता दिगंबर नारायण चव्हाण, नारायण पद्मा चव्हाण, मयुरेश नारायण चव्हाण, लहू महादेव मालीम, सोमनाथ धनंजय चव्हाण, लहू पद्मा वासकर, प्रदीप परशुराम वासकर, व ६ खलाशी ही बोट घेऊन मासेमारीसाठी जात होते. नांदवली दीपस्तंभ मणेरी या समुद्रात आली असता बोटीला पंख्यामध्ये खडक लागला. यात बोटीत पाणी भरू लागले. नाखवा दिगंबर चव्हाण यांनी त्वरित त्याच परिसरात मासेमारी करणाऱ्या गंगासागर बोटीचे मालक दिलीप आगरकर यांना संपर्क करीत माहिती दिली. आगरकर यांनी आपली बोट त्वरित घटनास्थळाकडे वळवली. मात्र तोपर्यंत रोहिदास बोट बुडू लागली होती. बोटीवर असणारे नाखवा व सहा खलाशी यांनी समुद्रात उड्या मारल्या. नशिबाने आगरकर बोटीसह तेथे पाेहोचले, त्यामुळे ते सर्वजण वाचले.
एका खलाशावर उपचार सुरु : लहू पद्मा वासकर यांच्या नाकातोंडात पाणी शिरल्याने तब्येत बिघडली होती. त्यांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.