नेरळ : कर्जत तालुक्यातील उमरोली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या इमारतीवर पाच महिन्यापूर्वी घालण्यात आलेले छप्पर ५ ऑगस्टच्या पहाटे वादळी वाºयाने उडून गेले. शाळेच्या इमारतीचा स्लॅबला गळती लागल्याने ग्रामपंचायतीने आपल्या निधीमधून शाळेला पत्र्याचे छप्पर टाकून दिले होते.शनिवारपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दुपारनंतर थांबला होता. मात्र पावसाच्या विश्रांतीनंतर वादळी वाºयाने त्याची जागा घेतली होती. सोसाट्याचा वारा रात्रभर सुरू होता, त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने सर्व हैराण होते. डिकसळपासून पुढे कर्जत भागातील वीज खंडित झाली. त्यावेळी उमरोली येथे विजेच्या मुख्य वाहिनीवर दोन खांब वादळी वाºयाने वाकले होते. त्या ठिकाणी असलेले विजेच्या तारा रस्त्यावर अस्तव्यस्त पडल्या आहेत. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच उमरोली गावात राहणाºया ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनिता बुंधाटे यांच्यासह विनोद लोंगले, मनोज गायकर, दीपक बुंधाटे, रामदास तुपे, उमरोली गावातील गामस्थ तेथे पोहचले.वीज खंडित का झाली हे माहिती घेण्यासाठी उमरोली ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांनी सकाळी घटनास्थळी पोहचवून मदत कार्य सुरू केले. महावितरणचे शाखा अभियंता जफर यांनी रस्त्यावर पडलेल्या तारा बाजूला करण्यास मदत केली. दुपारी रस्त्यावरील तारा बाजूला करण्यात आल्या असून वादळाने उडालेली पत्रे ज्या विजेच्या खांब्यावर पडली होती. ते खांब बाजूला करून नवीन खांब उभे करण्यासाठी कामे सुरू आहेत. सरपंच सुनिता बुंधाटे यांनी दिवसभर उभे राहून शाळेची पत्रे पुन्हा इमारतीवर छप्पर टाकण्यासाठी उभे राहून काम करीत आहेत. तर सोमवार सायंकाळपर्यंत वीज सुरू करण्यात यश येईल असा विश्वास महावितरणचे उपअभियंता आनंद घुले यांनी दिली. विजेचे खांब वाकल्याने किमान १५ गावातील वीज गायब झाली आहे.
उमरोलीतील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 11:33 PM