ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरशीने सुमारे 80 टक्के मतदान; उद्या होणार फैसला
By निखिल म्हात्रे | Published: November 5, 2023 08:47 PM2023-11-05T20:47:31+5:302023-11-05T20:47:42+5:30
रायगड जिल्ह्यातील एकूण 1414 उमेदवारांचे भवितव्य एव्हीएम मशीनमध्ये बंद
अलिबाग- आरोप-प्रत्यारोपांनी रंगलेल्या जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उशिरापर्यंत मतदान केंद्रांवरून निवडणूक अधिकारी कर्मचारी सर्व सामुग्री घेऊन येत असल्याने 5.30 पर्यंतचा अधिकृत आकडा समजू शकला नसला तरी सुमारे 80 टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांची वर्तविला आहे.
किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सरपंच व सदस्यत्वासाठी अनुक्रमे 168 व 1246 अशा एकूण 1414 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. त्याचा फैसला सोमवारी (दि. 06) होणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती झाल्या असून शिंदे-भाजपा गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. थेट पक्षीय स्वरुप न देता गट,पॅनल बनवून ही निवडणूक लढविली जात असलीतरी शिवसेनेतील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी
रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरु झाले असुन दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 65.58 टक्के मतदान झाले आहे. त्यात अलिबागमध्ये 69.52 टक्के मतदान झाले असून मुरुड 61.02 टक्के, पेण 71.63 टक्के, पनवेल 72.37 टक्के, उरण 77.81 टक्के, कर्जत 65.29 टक्के, खालापूर 53.54 टक्के, रोहा 66.29, सुधागड 69.09 टक्के, माणगाव 64.90 टक्के, तळा 59.70 टक्के, महाड 75.21 टक्के, पोलादपूर 68.15 टक्के, म्हसळा 51.02 टक्के तर, श्रीवर्धनमध्ये 50.15 टक्के मतदान झाले आहे.
दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी ३० टक्के मतदान झाले होते. सायंकाळनंतर त्यामध्ये काही प्रमाणात वाढ होत गेली. सकाळी साडेनऊ पर्यंत त्यांचे प्रमाण १५.०८ टक्के तर साडेअकरा वाजेपर्यंत सरासरी २१ .३३ टक्के इतके होते. रखरखते ऊन असल्याने अनेकांनी सकाळच्या टप्प्यात मतदान केले. त्यामुळे अकरानंतर दुपारी अडीच पर्यंत बहुतांश ठिकाणची मतदान केंद्रावर शुकशुकाट होता.
रायगड जिल्ह्यातील 210 सार्वत्रिक ग्रामपंचायतीत थेट सरपंच व सदस्यत्वासाठी निवडणूका जाहीर झाल्या होत्या. मात्र त्यापैकी 38 सरपंच व 565 सदस्य बिनविरोध झाल्याने उर्वरित ठिकाणी चुरशीने प्रचार करण्यात आला होता. बहुतांश ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती झाल्या असून तुल्यबळ उमेदवारांमुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती.
ग्रामपंचायतीसाठी जिल्ह्यात एकूण 652 मतदान केंद्र बनविण्यात आली होती. त्यामध्ये एकूण 3 लाख 81 हजार 423 मतदारांचा समावेश होता. निवडणुकीच्या कामासाठी जिल्ह्यात एकूण प्रशासनाचे ३,७०८ अधिकारी-कर्मचारी कर्तव्य नेमले होते. अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व भाजपाने युती करून एक उमेदवार दिला होता. तर उद्धव ठाकरे गट,राष्ट्रवादी ,काँग्रेस व शेकापची मिळून महाआघाडीचा उमेदवार पॅनल बनवून निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीचे निकाल आगामी जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीची ‘लिटमेस’ टेस्ट समजली जात आहे.