रोहा शहरात मोकाट गुरांचा उपद्रव
By admin | Published: September 14, 2016 04:38 AM2016-09-14T04:38:27+5:302016-09-14T04:38:27+5:30
तहसील कार्यालयासमोर तसेच रोहा शहरात सध्या मोकाट गुरांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे सा-यांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
रोहा : तहसील कार्यालयासमोर तसेच रोहा शहरात सध्या मोकाट गुरांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे सा-यांनाच त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना रस्त्यावर गुरे उभी असल्यामुळे अडचण येत आहे. यामुळे यावर योग्य उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
रोहा शहरातील मुख्य हमरस्ता, तहसील कार्यालयासमोरी जागेत, दमखाडी त्रिमूर्ती नगर, न्यु कुंडलिका संकुल आदी ठिकाणी या मोकाट गुरांनी सध्या आपले बस्तान बसविले असल्याने सर्वांनाच याचा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य हमरस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी, वाहनचालक व शासकीय कामासाठी तहसील कार्यालयात येणारे नागरिक यांना या मोकाट गुरांमुळे रस्त्यावरुन वाहन चालवणे जिकरीचे झाले आहे. तहसील कार्यालयासमोरील मार्ग हा अलिबाग व मुरूड तालुक्याना जोडला असल्याने या मार्गावर नेहमीच प्रवासी वाहने, खाजगी यांची वर्दळ असते. तसेच प्रशासकीय कामासाठी तहसील कार्यालय, फॉरेस्ट कार्यालय व पोलीस स्टेशनला आपल्या दैनंदिन कामासाठी येणा-या नागरिकांची संख्याही मोठी असल्याने या सर्वांना या मोकाट गुरांचा मोठा त्रास होत आहे. त्रिमूर्ती नगरमधील न्यु कुंडलिका संकुलातील रहिवाशी या मोकाट गुरांच्या त्रासाने हैराण झाले आहेत. मोकाट गुरांच्या संचाराने येथील नागरिकांना मोठा उपद्रव सहन करावा लागत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी न्यु कुंडलिका संकुलाचे अध्यक्ष संजय धोदरे यांनी केली आहे. (वार्ताहर)