पनवेल : भारतातून परदेशात जाणारी रॉयल्टी मोठी आहे. अगदी पाण्याच्या बाटलीपासून, टूथपेस्ट, साबण अशा अनेक लहानसहान गोष्टी परदेशातून भारतात आयात केल्या जातात. भारत महासत्ता होण्याच्या गोष्टी करीत असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात रॉयल्टी देशाबाहेर जाणे आपणास परवडणार नसल्याचे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. पनवेल येथे सोमवारी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सिटीझन युनिट फोरमच्या वतीने आयोजित संवादमालेत ते बोलत होते.‘भारताच्या भवितव्याबद्दल संवाद’ या विषयावर काकोडकरांनी आपले परखड मत मांडत उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारताच्या विकासाबद्दलची संकल्पना यावेळी काकोडकरांनी स्पष्ट केली. १७०० साली भारताचा जीडीपी दर जगभरात प्रथम क्रमांकावर होता. त्यानंतर मात्र भारताच्या अधोगतीला सुरुवात झाली. आज विविध तंत्रज्ञानाच्या वस्तू आपण खरेदी करतो. त्या वस्तू परदेशी कंपन्यांच्या असल्याने तो पैसा परदेशात जातो. हेच तंत्रज्ञान भारतात विकसित झाल्यास तो पैसा भारतातच राहील. तंत्रज्ञानात प्रगत असलेले देश सर्वत्र पुढे आहेत. इतर देशाच्या तुलनेत भारतात युवा वर्गाची संख्या सर्वात जास्त असल्याने २०३५ पर्यंत प्रगत देशांत भारताचा समावेश होऊ शकतो.भारताने संशोधनावर अधिक खर्च करणे गरजेचे आहे. फिनलँड या देशाच्या नोकिया कंपनीचे एकेकाळी जागतिक बाजारपेठेत मोठे वलय होते. या कंपनीमुळे फिनलँड देशाची अर्थव्यवस्था उंचावण्यास मोठा वाटा आहे. तंत्रज्ञानात मोठी ताकद असून भारतात मोठी बाजारपेठ असल्याने परदेशी कंपन्या आपल्या देशात येण्यास उत्सुक आहेत. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रत्येक घडामोडीसाठी होणे गरजेचे असल्याचा कानमंत्र त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी कफचे अध्यक्ष अरु ण भिसे, सदस्य व ६00 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते.लोकमत मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने काकोडकरांना प्रश्न विचारले. कुतूहलापोटी विचारलेल्या प्रश्नांचीही काकोडकरांनी समाधानकारक उत्तरे दिल्याने विद्यार्थ्यांच्या चेहºयावर आनंद दिसत होता.१एलियनबद्दल विचारणा केली असता, हा विषय कुतूहलाचा असून मलाही याबाबत उत्सुकता आहे. ज्या प्रकारे मानवी उत्पत्ती झाली तसेच इतर ग्रहांवर ज्या ठिकाणी जीवसृष्टी आहे त्याठिकाणी एलियनची उत्पत्ती होऊ शकते. मानवाला दुसºया ग्रहांवर जावेसे वाटत असेल तर एलियनलाही तसे वाटू शकते, असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले.२आपण देव मानतो मात्र कर्मकांडावर विश्वास ठेवत नाही. देव ही संकल्पना मला विनम्र राहण्यास मदत करते, असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.अणुचाचण्या नेहमी पृथ्वीवरच का होतात, चंद्र किंवा इतर ग्रह, ज्याठिकाणी जीवसृष्टी आहे अशा ठिकाणी का होत नाही असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला असता, अणुचाचण्यांदरम्यान केवळ स्फोट घडवून चालत नाही.त्याचे परीक्षणही करावे लागत असल्याने पृथ्वीबाहेर अशा प्रकारे चाचणी केल्यास ते खर्चीक असल्याचे काकोडकर यांनी सांगितले. तर अणुबॉम्बचा ज्यावेळी स्फोट होतो त्यावेळी त्याला मशरूमसारखा भव्य आकार प्राप्त होत असल्याने नेहमी अणुबॉम्बचा आकार मशरूमसारखा दाखवला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणे सोपे नाही. पाकिस्तान किंवा चीन यासारख्या देशांना ते परवडणारे नाही. भारतावर अशाप्रकारे हल्ला केल्यास संबंधित देशांनाही मोठी फळे भोगावी लागू शकतात, असेही यावेळी स्पष्ट केले.
देशाबाहेर जाणारी रॉयल्टी महासत्तेसाठी थांबली पाहिजे - अनिल काकोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 6:21 AM