नवी मुंबई : धावत्या रेल्वेसमोर पडल्याने गंभीर जखमी होवून रेल्वेखाली अडकलेल्या तरुणाला आरपीएफच्या मदतीने जिवदान मिळाले आहे. मंगळवारी दुपारी कोपर खैरणे रेल्वेस्थानकात हि घटना घडली होती. यावेळी त्याला वेळीच रुग्नालयात दाखल करण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.
किरण धनावडे (२४) असे थोडक्यात बचावलेल्या तरुनाचे नाव आहे. तो ऐरोलीचा राहणारा असून कोपर खैरणे रेल्वेस्थानकात फलाट क्रमांक दोन वर त्याच्यासोबत हि दुर्घटना घडली. वाशीहून ठाणेकडे जाणारी लोकल फलाटावर येत असताना तो फलाटावर उभा होता. यावेळी अचानकपने तो रेल्वेसमोर रुळावर पडल्याने त्याच्या दोन्ही पायावरुन रेल्वे गेली. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानकातील रेल्वे सुरक्षा बलाचे जवान (आरपीएफ) राजेशकुमार मिना, राधेश्याम गुर्जर व नराडे यांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी रेल्वे जागीच थांबवून रेल्वेखाली घुसून जखमी किरण याला बाहेर काढले. तसेच त्याला तात्काळ वाशीतील पालिका रुग्नालयात उपचारासाठी दाखल केले. या दुर्घटनेत त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. परंतु वेळीच त्याला रुग्नालयात दाखल करुन उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले असल्याचे आरपीएफ चे निरिक्षक पी. के. विश्वकर्मा यांनी सांगितले. तर फलाटावर उभे असताना अचानक आपण रेल्वेसमोर रुळावर पडल्याचे जखमी धनावडे याने सांगितल्याचेही विश्वकर्मा यांनी सांगितले.