धाटावमध्ये बँकेत २५ लाखांची चोरी

By admin | Published: March 29, 2016 03:20 AM2016-03-29T03:20:59+5:302016-03-29T03:20:59+5:30

तालुक्यातील बँक आॅफ महाराष्ट्र धाटाव शाखेत २५ लाख रुपयांच्या रोख रकमेची चोरी झाली आहे. विशेष म्हणजे कुठलीही तोडफोड न करता चोरट्यांनी एवढी मोठी रक्कम लाटली आहे.

Rs 25 lakh theft in the bank | धाटावमध्ये बँकेत २५ लाखांची चोरी

धाटावमध्ये बँकेत २५ लाखांची चोरी

Next

रोहा : तालुक्यातील बँक आॅफ महाराष्ट्र धाटाव शाखेत २५ लाख रुपयांच्या रोख रकमेची चोरी झाली आहे. विशेष म्हणजे कुठलीही तोडफोड न करता चोरट्यांनी एवढी मोठी रक्कम लाटली आहे. सलग चार दिवस सुटी असल्याने बँक बंद होती. या दरम्यान ही घटना घडली असल्याची माहिती रोह्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
रोहा येथील धाटाव औद्योगिक वसाहतीतील सामाईक सुविधा केंद्र येथे बँक आॅफ महाराष्ट्रची शाखा आहे. बुधवारी २३ मार्चला बँकेचे कामकाज सायंकाळी नियमित वेळेत बंद झाले. २४ ते २७ मार्च दरम्यान सलग चार दिवस बँकेला सुटी होती. या दरम्यान चोरट्यांनी शक्कल लढवून कुठलीही तोडफोड न करता मुख्य दरवाजाचा आणि तिजोरीचा टाळा उघडून २५ लाख रुपयांहून अधिक रक्कम लांबविली. पुन्हा दोन्ही ठिकाणांची कुलुपे लावून चोरट्यांनी पोबारा केला. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे बँक उघडली जात असताना बँकेच्या अधिकाऱ्यांच्या हे लक्षात आले. शाखा व्यवस्थापक एस. ए. अहमद सैफुद्दीन यांनी रोहा पोलिसांना या चोरीची माहिती दिली. रोहा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय धुमाळ तपास करीत आहेत. संपूर्ण पोलीस यंत्रणा तपासात दिवसभर व्यस्त होती. चोरीस गेलेल्या रकमेचा नक्की आकडा स्पष्ट होत नसला तरी अंदाजे २५ लाखांहून अधिक रक्कम चोरीला गेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली, त्याबरोबर दार व तिजोरीची कुलुपे व्यवस्थित बंद करण्यात आली असल्याने चोरटे हे नेहमीचे माहीतगार असावेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सलग चार दिवस सणासुदीच्या सुट्या असल्याने रोहा पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून बिट मार्शलमार्फत मंगळवारी २२ मार्चला तालुक्यातील सर्व बँकांना सतर्क राहण्याबाबतच्या लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. यामध्ये बँक अलार्म, सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक आदीबाबत सतर्कता बाळगण्याच्या लेखी सूचनाही करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Rs 25 lakh theft in the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.