वयाळजवळ होणार आरटीओ कार्यालय

By admin | Published: April 11, 2017 01:51 AM2017-04-11T01:51:45+5:302017-04-11T01:51:45+5:30

कळंबोली स्टील मार्केटमध्ये भाडोत्री जागेवर असलेल्या पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाला करंजाडे याठिकाणी जागा सिडकोने उपलब्ध करून दिली आहे,

RTO office will be near Yayal | वयाळजवळ होणार आरटीओ कार्यालय

वयाळजवळ होणार आरटीओ कार्यालय

Next

मोहोपाडा : कळंबोली स्टील मार्केटमध्ये भाडोत्री जागेवर असलेल्या पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाला करंजाडे याठिकाणी जागा सिडकोने उपलब्ध करून दिली आहे, परंतु तो भूखंड अपुरा पडत असल्याने परिवहन विभागाने रसायनी पाताळगंगाजवळील वयाळ गावात जागा शोधली आहे. त्याचबरोबर पनवेल तालुक्यातही शासकीय जागेचा शोध सुरू आहे. सर्व सुविधा निर्माण करण्याकरिता कमीत कमी तेरा एकर जागेची आवश्यकता आहे. त्या दृष्टिकोनातून जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत.
पनवेल परिसराचा वाढता विस्तार त्याचबरोबर ठाणे परिवहन आणि पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर ताण पडत होता. स्थानिकांच्या मागणीनुसार राज्य परिवहन विभागाने नोव्हेंबर २०१० मध्ये ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे विभाजन करून पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू केले. त्याचबरोबर पेण कार्यालयावरील ताण कमी करण्याकरिता पनवेल, कर्जत, खालापूर या तालुक्यांकरिता पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले. सुरवातीला कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी संकुलातील कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र वाढती गर्दी पाहता एक कॅम्प अकादमी परिसरात ठेवून कळंबोली स्टील मार्केटमध्ये कार्यालय हलविण्यात आले. या ठिकाणीही जागा अपुरी पडत आहेच, त्याचबरोबर अवजड वाहनांच्या गर्दीत येथे असल्याने याठिकाणी ये-जा करण्याची कसरत करावी लागत आहे. याशिवाय ही जागा भाडेतत्त्वावर असल्याने आरटीओचे बिऱ्हाड पाठीवरच
आहे.
सर्वात मोठी अडचण म्हणजे वाहनचालकांची चाचणी घेण्याकरिता आणि वाहनांची तपासणी करण्यासाठी स्टील मार्केटमध्ये जागाच नाही. म्हणून पनवेल आरटीओ कार्यालयाला हक्काची आणि मुबलक जागा असावी याकरिता गेल्या सहा-सात वर्षांपासून शोध सुरू आहे. याकरिता परिवहन विभागाकडून सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. सर्व सुविधा निर्माण करण्याकरिता कमीत कमी तेरा एकर जागेची आवश्यकता आहे. (वार्ताहर)

Web Title: RTO office will be near Yayal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.