रुक्मिणीच्या आईला मिळाले अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 11:37 PM2019-10-06T23:37:03+5:302019-10-06T23:37:35+5:30
शनिवारी या रुक्मिणीच्या आईला अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
कर्जत : अरविंद येथील आदिवासी कातकरवाडीतील तीव्र कुपोषित श्रेणीतील चार वर्षांची रुक्मिणी शिवराम पवार ही कर्जत येथील बाल उपचार केंद्रात मागील १८ दिवस पोषण व आरोग्यसेवा घेत आहे. शनिवारी या रुक्मिणीच्या आईला अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
३ आॅक्टोबर रोजी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बाल उपचार केंद्रास भेट दिली होती. या भेटी वेळी पालकांनी रेशन व्यवस्थेबाबत तक्रारी मांडल्या. या समस्या सोडवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी नायब तहसीलदार यांना दिल्या होत्या; त्या सूचनेनंतर ४ आॅक्टोबर रोजी रुक्मिणीच्या आईला अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड बाल उपचार केंद्रातच उपलब्ध करून देण्यात आले. रविवारी पुरवठा विभागाचे अव्वल कारकून संजय तवर, पुरवठा विभागाचे कर्मचारी अक्षय जाधव यांनी बाल उपचार केंद्रात प्रत्यक्ष भेटून या कार्डाचे वाटप केले.
१३ कुपोषित बालक
- रुक्मिणी सारख्याच इतर बालकांच्या कुटुंबात सुद्धा रेशन कार्ड जीर्ण झाले आहेत, त्या सर्वांची नवीन रेशन कार्ड बनवून दिले जातील, अशी माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.
- १३ तीव्र कुपोषित श्रेणीतील मुले या उपचारकेंद्रात दाखल आहेत.