अलिबाग : सुमारे ६२ गावांतील तब्बल ६० हजार नागरिकांची तहान भागवणाºया उमटे धरणातून अशुद्ध पाण्याचा पुरवठा सातत्याने होत आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या (समाज माध्यम) माध्यमातूनही यावर आसूड ओढले जात आहेत. काही दिवसांवरच विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. विरोधक याच मुद्द्याचा आधार घेऊन पक्षाची बदनामी करण्याच्या शक्यतेने सत्ताधाऱ्यांना जाग आल्याचे दिसून येते. उमटे धरणाच्या प्रश्नी भूमिका स्पष्ट करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांना पुढे यावे लागले आहे. महिनाभरातच शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन देत त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रश्नाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
उमटे धरण हे १९८४ मध्ये बांधण्यात आले आहे. या धरणातून ६२ गावांतील तब्बल ६० हजार नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत असतो. या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे गुरुत्वीय बलाच्या माध्यमातून हे पाणी नागरिकांच्या घरात पोहोचते. गेली कित्येक वर्षे या धरणातून येणाºया पाण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला नसल्याने नागरिकांना टीसीएल पावडरचा मारा करून पाणी दिले जात होते. सुमारे पाच वर्षांपूर्वी या धरणावर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते. यासाठी तीन कोटी ३४ लाख रुपयांची पहिली निविदा काढण्यात आली होती. त्यामध्ये ४५ कि.मी.ची पाइपलाइनची दुरुस्ती, जलशुद्धीकरण प्रकल्प, उमटे धरणाच्या डागडुजी कामाचा समावेश होता.अपूर्ण काम असतानाही रायगड जिल्हा परिषदेने दोन कोटी ९० लाख रुपये ठेकेदाराला अदा केले होते. त्यानंतर स्थानिक नागरिक अॅड. कौस्तुभ पुनकर, अॅड. राकेश पाटील यांच्यासह अन्य नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर काम पूर्ण करण्याकरिता २०१८-१९ या कालावधीत रायगड जिल्हा परिषदेने नव्याने एक कोटी ४० लाख रुपयांची निविदा काढली. त्यानंतर दुसरा ठेकेदार नेमल्यानंतर जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. याबाबतचे प्रात्यक्षिक एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केले.मात्र, पाण्याची पातळी कमी असल्याने सांडव्यातून कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. जलशुद्धीकरण प्रकल्पातून अशुद्ध पाणी बाहेर जाण्यासाठी नव्याने सांडवा बांधण्याची गरज होती. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेने नव्याने अनुक्रमे २२ लाख आणि २० लाख रुपयांच्या निविदा जून २०१९ रोजी काढल्या होत्या.जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण झाला आहे, त्यासाठी तांत्रिक अधिकारीही नेमण्यात आला आहे. गणपतीपूर्वी शुद्ध पाणी सुरू करण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार ३० आॅगस्ट रोजी शुद्ध पाणी सोडण्यात आले होते; परंतु वॉल खराब झाल्याने पुन्हा मातीमिश्रीत पाणी नळाद्वारे येऊ लागले. त्यामुळे येत्या महिन्यात जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असे आश्वासन उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील यांनी दिले. निवडणुकीच्या तोंडावरच पक्षाची होणारी बदनामी कोणत्याच राजकीय पक्षाला परवडणारी नाही. रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनीच यामध्ये आता लक्ष घातले आहे. त्यांनी ३० दिवसांमध्ये शुद्ध पाणी देण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. त्यांनी दिलेले आश्वासन खरे ठरावे हीच समस्त नागरिकांची इच्छा असल्यास नवल नसावे.सर्वसाधारण सभेत गाजला मुद्दाया उमटे धरणाचा मुद्दा सातत्याने रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही चांगलाच गाजला आहे. त्याचप्रमाणे विविध तक्रारीही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. काहीच दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे उमटे धरणाचा मुद्दा आतापासूनच सोशल मीडियावर गाजत आहे. त्यामध्ये शेकापला चांगलेच लक्ष्य केले जात आहे. यामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हेच सर्वात आघाडीवर आहेत.आधी हे काम शेकापच्या स्थानिक आमदारांच्या कंपनीला देण्यात आले होते. त्यांनी ते काम अर्धवट आणि चांगले न केल्याने सावंत-देसाई या ठेकेदाराला देण्यात आले.त्यांनी काम पूर्ण केले आहे; परंतु अद्यापही पाणी अशुद्धच येत असल्याने नागरिकांना तेच पाणी प्यावे लागत आहे, असे स्थानिक नागरिक अॅड. राकेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.