रासायनिक घनकचरा वाहतूक नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 03:28 AM2018-04-14T03:28:30+5:302018-04-14T03:28:30+5:30

मुंबई-गोवा महामार्गावरून औद्योगिक क्षेत्रातील घनकचरा वाहतूक करताना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे आणि वाहतूक विभागाचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

On the rules of chemical solid waste transport | रासायनिक घनकचरा वाहतूक नियम धाब्यावर

रासायनिक घनकचरा वाहतूक नियम धाब्यावर

googlenewsNext

- सिकंदर अनवारे 
दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावरून औद्योगिक क्षेत्रातील घनकचरा वाहतूक करताना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे आणि वाहतूक विभागाचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. रस्त्यावर ओला घनकचरा सांडत जाणारी वाहने मुंबई-गोवा महामार्गावर दिसून येत असून, ओला कचरा वाहनांतून टाकणाऱ्या कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणतेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक घनकचरा हा संबंधित कंपन्यांनी कंपनीच्या आवारात वाळवून मगच मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सारख्या प्रकल्पांना नष्ट करण्यासाठी देणे अपेक्षित आहे. मात्र, गोवा महामार्गावर हे नियम धाब्यावर बसवून रासायनिक घनकचरा वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. खेड, चिपळूण या परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यातून अशा प्रकारचा रासायनिक घनकचरा वाहतूक होत आहे. महाडपासून पुढे मुंबईपर्यंत वाहनातून कचरा सांडत जाणारी वाहने महामार्गावर दिसून येत आहेत. ज्या वाहनांना रासायनिक घनकचरा वाहतूक करण्याचे मंडळाचे परवाने आहेत, ती वाहनेदेखील वाहनाच्या वरील बाजूस आच्छादन न टाकता वाहतूक करत असल्याने वाहनामधील घनकचरा हवेने मागील बाजूस सांडत आहे. अनेकदा हा घनकचरा ओला असल्याने त्यामधून रासायनिक घनकचरा आणि पाणी मागील बाजूस उडत असल्याने दुचाकीस्वारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
कारखान्यातून बाहेर पडणारा रासायनिक घनकचरा आणि त्यातील घटक हे मानवी आरोग्याला घातक ठरू शकतात. परिणामी, घनकचरा उघड्यावर टाकण्यास मनाई आहे. मात्र, अनेकदा हा घनकचरा रस्त्याच्या कडेला आणि नदीत टाकून देण्याच्या घटना उघड झाल्या आहेत. असे असतानादेखील आजही अशाच प्रकारे वाहतूक होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महाड औद्योगिक क्षेत्रात देखील काही दिवसांपूर्वी मल्लक आॅइल केम या कारखान्यातील घनकचरा वाहतूक करणारे वाहन निदर्शनास आणून दिल्यानंतर महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेतले आहे. आजही हे वाहन महाड औद्योगिक पोलीसठाण्यात उभे करून ठेवण्यात आले आहे. यातील नमुनेदेखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढील तपासणीसाठी पाठवून दिले आहेत.
काही दिवसांपूर्वीच महाडजवळ पुन्हा अशाच प्रकारचा घनकचरा वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम.एच.०४ सी यू २२४५ आढळून आला. या ट्रकमध्ये घनकचरा गोणीमध्ये भरलेल्या अवस्थेत होता. मात्र, हा घनकचरा ओला असल्याने मागील बाजूस त्यातील पाणी दुचाकीवरून प्रवास करणाºया प्रवाशांवर उडत होते. हा कचरा खेडमधील घरडा केमिकल या कंपनीचा असल्याचे चालकाजवळील पावतीवरून निदर्शनास आले. मात्र, संबंधित कंपनी अशा प्रकारे ओला कचरा आपल्याकडून गेला नसल्याचे सांगून हात वर करत आहे. या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे देखील नियंत्रण नसल्याचे यातून दिसून येत आहे.
खेड, चिपळूण, रत्नागिरी या परिसरांतून महामार्गावरून उघड्या वाहनातून ओला कचरा वाहतूक करत मुंबईपर्यंत नेला जातो. यादरम्यान चिपळूण, खेड, महाड, पुढे पेण, पनवेलपर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्यालये आहेत. मात्र, या कार्यालयाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने अशा ओला कचरा कंपनीच्या बाहेर काढणाºया कंपन्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.
>पोलीस आणि आर.टी.ओ. प्रशासनाचीही डोळेझाक
मुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी पोलीस आणि आर.टी.ओ. प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असतात. मात्र, याच महामार्गावर नियम धाब्यावर बसवून रासायनिक घनकचरा वाहतूक करणारी वाहने ये-जा करीत असतात. याबाबत पोलीस आणि परिवहन विभाग डोळेझाक करीत असून या कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. खेडमधून निघणारे वाहन हे कशेडी, केंबुर्ली येथील पोलीस पथकाजवळूनच मुंबईकडे जातात. पोलीस आणि परिवहन विभागाकडून कारवाई अपेक्षित आहे.
>कारवाई करण्याचे अधिकार आपणास नाहीत. मात्र, जनसामान्यांच्या आरोग्याच्या आणि पर्यावरणाचा विचार करता कारवाईचा प्रस्ताव पाठवू शकतो. यामुळे संबंधित कंपनीवर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव प्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडे निश्चित पाठविण्यात येईल. मुळात कारखानदारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.
- रवींद्र आंधळे, उपप्रादेशिक अधिकारी
>कंपनीतून गेलेले मटेरियल हे ओल्या प्रकारात गेलेले दिसून येत नाही.
- अनिल भोसले, व्यवस्थापक, घरडा केमिकल, खेड
ओला घनकचरा वाहतूक करणे चुकीचे आहेच, शिवाय ज्या कंपन्या अशा प्रकारे ओला घनकचरा बाहेर काढतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी त्या त्या ठिकाणी असलेल्या उपप्रादेशिक अधिकाºयांची आहे.
- दिलीप खेडेकर,
प्रादेशिक अधिकारी, कोल्हापूर

Web Title: On the rules of chemical solid waste transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.