गारबेटवाडीत ‘थेंंब’भर पाण्यासाठी धावपळ
By admin | Published: April 21, 2016 02:44 AM2016-04-21T02:44:17+5:302016-04-21T02:49:59+5:30
मूळची खालापूर तालुक्यातील परंतु कर्जत तालुक्यातून सर्व व्यवहार होत असलेली गारबेटवाडी सध्या पाणीटंचाईच्या समस्येने बेचैन आहे.
कांता हाबळे, नेरळ
मूळची खालापूर तालुक्यातील परंतु कर्जत तालुक्यातून सर्व व्यवहार होत असलेली गारबेटवाडी सध्या पाणीटंचाईच्या समस्येने बेचैन आहे. वाडीतील पिण्याच्या पाण्याने तळ गाठल्याने थेंबभर पाण्यासाठी घोड्याबरोबर येथील आदिवासींची धावपळ सुरू आहे. सरकारी टँकर तेथील आदिवासी धनगर लोकांच्या आयुष्यात एकदाही पोहचला नसल्याने गारबेटवाडीतील अनेक कुटुंबांनी माथेरानला तात्पुरते आपले कबिले हलविले आहेत.
कर्जत तालुक्यातून नेरळ-माथेरान घाट रस्त्याने गारबेटवाडीला जाण्यासाठी पायवाट जाते. अशा आडवाटेला असलेल्या गारबेटवाडीतील संपूर्ण व्यवहार सुरू आहे, तो माथेरानबरोबर. अन्य वेळी नेरळला बाजारहाटासाठी या आदिवासींचा संबंध येतो. गारबेटवाडीमधील आदिवासी धनगर लोकांचा दुग्ध व्यवसाय आणि अश्व पालन यावर उदरनिर्वाह चालतो. उंच भागात असलेल्या गारबेटवाडीतील २७ घरांच्या वस्तीला पिण्याचे पाणी तेथे असलेल्या नैसर्गिक झऱ्यावर जानेवारीपर्यंत मिळते. पुढे येथील लोकांना त्या डवऱ्याचे पाणी घरी आणण्यासाठी नंबर लावून रात्र जागून काढावी लागते. आता तर गारबेटवाडीतील पिण्याच्या पाण्याची स्थिती आणखी गंभीर झाली आहे. कारण नैसर्गिक झऱ्याने देखील तळ गाठल्याने आता प्रामुख्याने येथील तरु ण मुलांची पायपीट वाढली आहे. सुटी असल्याने घरच्या महिला वर्गाला पाणी आणण्यासाठी मदत करण्याचे काम ही मुले करीत आहेत.
गारबेटवाडीतील सर्व धनगर बांधव हे दररोज आपले अश्व घेवून माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सेवा देण्याचे काम करतात. त्यातून मिळणारा रोजगार यावर आपले कुटुंब चालविणाऱ्या येथील लोकांना आता आपले काही घोडे व्यवसाय सोडून पाणी आणण्यासाठी लावावे लागले आहेत. येथील आदिवासी लोक आता घोड्याच्या पाठीवरु न पिण्याचे पाणी आणण्याची कसरत करताना दिसत आहेत. माथेरानला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नेरळ-माथेरान घाट रस्त्याने जाते. घाट रस्त्यावरु न गारबेटवाडीला जाणारा रस्ता वळतो. तेथे थेंब थेंब पाणी गळत असते,ते पाणी २० लीटरच्या डब्यात साठवून गारबेटवाडीतील तरु ण तासभर पायपीट करून घोड्याच्या बरोबर वाडीमध्ये पोहचतात. घोड्याच्या पाठीवरु न पाण्याने भरलेले डबे नेताना बरेच पाणी रस्त्यावर पडते. जेमतेम अर्धा डबा पाणी वाडीपर्यंत पोहचते. अशी कसरत पाणी वाडीपर्यंत नेताना आदिवासी लोक करीत असून थेंबभर पाण्यासाठी सुरु असलेली वणवण कधी थांबणार याची खात्री नसल्याने वाडीतील अनेक कुटुंबे माथेरानच्या विविध भागात तात्पुरते स्थलांतरित झाले आहेत.
> माजगाव आदिवासी वाडीत तीव्र पाणीटंचाई
खोपोली : खालापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पाणीटंचाईची झळ बसत आहे. येथील जलाशयांनी तळ गाठला असून विहिरी कोरड्याठाक पडल्याने येथील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. माजगाव आदिवासीवाडीतील महिलांना दीड किलोमीटरची पायपीट करून पौध गावातील विहिरीवरून डोक्यावर हंड्याने पाणी आणावे लागत आहे.
खालापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाकडून त्यासाठी केले जाणारे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे चित्र आहे. माजगाव आदिवासी वाडीतील लोकसंख्या मोठी आहे. येथील लोकांना हंडाभर पाण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागत असून यामध्ये महिलांचे प्रचंड हाल होत आहे. प्रशासनाने येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. पूर्वी या ठिकाणी असलेल्या विहिरीला बाराही महिने पाणी होते. मात्र मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेची निर्मिती करताना बोगद्याचे काम विहिरीजवळच झाल्याने नैसर्गिक झऱ्याचा मार्ग बदलला त्यामुळे १४ वर्षांपासून पावसाळा संपला की विहीर कोरडी पडत आहे. यामुळे पाण्यासाठी हाल होत आहेत अशी प्रतिक्रिया जना हिलम व बेबी वाघे या महिलांनी दिली. अनेक वर्षांपासून या वाडीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने स्वतंत्र पाणी योजना करण्याची मागणी सुशा जाधव यांनी केली. पाणी आणण्यासाठी दररोज पौध गावातील विहिरीवर जावे लागते. कच्चा रस्ता असल्याने डोक्यावर भरलेले तीन हंडे घेवून परत येताना खूप त्रास होतो.