जयंत धुळप, अलिबागजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना शालेय शिक्षण मोफत असले तरी त्यांचे शालेय साहित्य, गणवेश, शालेय सहलीची वर्गणी याकरिता ग्रामीण भागातील मुलींना त्यांच्या पालकांकडून पैसे उपलब्ध होत नाहीत. परिणामी या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास वा माता-पित्यांचे छत्र हरपलेल्या मुलींना वर्गातील इतर मुलींप्रमाणे शाळेतील आनंद उपभोगता येत नाही. या समस्येचा अत्यंत संवेदनशीलतेने अभ्यास करु न महाडमधील सावली सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणराज जैन आणि त्यांच्या पत्नी डॉ.अर्चना जैन यांनी गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या या ग्रामीण शाळांमधील छोट्या बहिणींना भाऊबीजेची आगळी भेट दिली. शासनाकडून अशा आर्थिक दृष्ट्या कमकुवत मुलींकरिता सावित्रीबाई फुले शैक्षणिक दत्तक पालक योजना राबविली जाते. या योजनेनुसार ३६५ रुपये एका मुली करिता त्यांच्या पालकांनी भरले की शासन तितकीच म्हणजे ३६५ रुपये रक्कम त्यात जमा करुन एकूण ७३० रुपये एका मुलीस उपलब्ध केले जातात. यातून मग त्या मुलीचा शालेय साहित्य, गणवेश, शालेय सहलीची वर्गणी यांचा खर्च भागवला जावून अन्य मुलींप्रमाणेच त्यांनाही शिक्षण आणि शैक्षणिक आनंद घेता येतो. मात्र प्रत्यक्षात ग्रामीण भागात मोलमजुरी करुन कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या या मुलींच्या पालकांना हे ३६५ रुपये देखील भरता येत नसल्याने या मुलींना अपेक्षित सुविधा आणि आनंदास मुकावे लागत होते. यासाठी जैन दाम्पत्याने या मुलींना आर्थिक मदत करुन या मुलींच्या आयुष्यात आनंद फुलवण्याकरिता एक नामी शक्कल लढवली. सर्व प्रथम गणराज जैन व त्यांच्या पत्नी डॉ.अर्चना जैन यांनी स्वत: महाड तालुक्यांतील नडगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही मुलींचे सावित्रीबाई फुले शैक्षणिक दत्तक पालक योजनेअंतर्गत प्रत्येकी ३६५ रुपये त्यांची दिवाळीची वार्षिक पालकत्वाची भाऊबीज म्हणून भरुन त्यांना शासनाचे ३६५ रुपये मिळवून देवून त्या प्रत्येक मुलीस ७३० रुपये मिळवून दिले आणि स्वत: भाऊ या नात्याने त्यांनी त्या मुलींचे पालकत्व स्वीकारले. हा आनंद अधिकाधिक मुलींना मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या परिचितांना या याबाबत माहिती देऊन अशा मुलींचे शैक्षणिक पालक बनण्याकरिता व्यक्तिगत पातळीवर आवाहन केले.२०११ मध्ये ६० मुलींचे पालकत्व स्वीकारले. त्यानंतर २०१२ मध्ये १२,२०१३ मध्ये १५, २०१४ मध्ये ४० तर या वर्षी २०१५ मध्ये ६४ मुलींचे या ३६५ रुपयांच्या भाऊबीजेच्या रुपातून गेल्या पाच वर्षांत १९१ मुलींना पालकत्वाची भाऊबीज प्राप्त होवू शकली आहे.
ग्रामीण भागातील मुलींना मिळाली भाऊबीज
By admin | Published: November 14, 2015 2:18 AM