खारभूमी बंधाऱ्यांच्या कामासाठी धावाधाव; मनुष्यबळाअभावी यंत्राद्वारे कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 02:16 AM2020-05-09T02:16:54+5:302020-05-09T02:16:57+5:30
मान्सूनपूर्व तयारी; खारभूमी विभागातील अधिकाऱ्यांनी कसली कंबर
दत्ता म्हात्रे
पेण : गतवर्षी महापुरात खारभूमी संरक्षक बंधारे फुटून पेण तालुक्यातील कणे, अंतोरे, मोठेवढाव, वाशी ओढांगी या वाशी विभागातील गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. या विभागाबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे गडब, खारपाले, कासू भागातील खारपाले, खारढोंबी जुईअब्बास, माचेला चिर्बी तर रावे, कोपर, भाल-विठ्ठलवाडी, वडखळ या खारभूमी क्षेत्रातील तब्बल ९००० एकरावर नापिकीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. यामुळे यावर्षी मान्सून हंगामापूर्वी या खारभूमी बंधाºयाची मजबुतीकरणाची कामे येत्या २५ दिवसांत करण्यासाठी खारभूमी विभागाचे अधिकारी सज्ज झाले आहेत.
गतवर्षी महापुरात फुटलेले समुद्र खाड्यांच्या संरक्षक बंधाºयांची देखभाल दुरुस्ती स्थानिक ग्रामस्थांनी प्राथमिक स्वरूपात केली होती. मात्र, यावर्षी मान्सून हंगामापूर्वी या खारभूमी बंधाºयाची मजबुतीकरणाची कामे येत्या २५ दिवसांत करण्यासाठी खारभूमी सर्वेक्षण अन्वेषण विभागासमोर मोठे शिवधनुष्य उचलण्याची कठीण समस्या उभी राहिलेली आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे संरक्षक बंधाºयांची कामे जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने करून मजबुती करणाची कामे करण्यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचे कार्यालयीन सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पेणच्या खाडीकिनारच्या गावांना खारभूमी संरक्षक बंधारे फुटून समुद्राचे पाणी व पावसाचे पाणी एकत्रित अतिवृष्टीच्या वेळी जमते, त्या वेळी महापूर येतो. या महापुराच्या पाण्याचा प्रचंड ओघ गावांमध्ये शिरून त्या, त्या गावाला पुराचा वेढा पडतो. गतवर्षी पेणमधील करणे गावाला पुराचा वेढा पडून पुरात अडकलेल्या ७५ नागरिकांना एनडीआरएफच्या जवानांनी रेस्क्यू आॅपरेशन करून प्राण वाचविले होते. कणे खारभूमी योजनेतील पूर्व बाजूकडील बंधारे जागोजागी फुटून भोगावती नदीपात्रातील पुराच्या पाण्याचा वेढा संपूर्ण गाव व परिसरातील वाड्यांमध्ये पडला होता. येत्या मान्सून हंगामात आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत महापूर येणार, असा हवामान खात्याने व इतर मान्सूनच्या अंदाज वर्तविणाºया वेधशाळांनी सांगितले आहे. खारभूमी बंधाºयांचे बळकटीकरणाची कामे जानेवारी महिन्यापासून सुरू व्हायला हवी होती. मात्र, योजनांचे आराखडे बनविण्यासाठी व या योजनावर विकास निधीची तरतूद, आॅनलाइन टेंडर प्रक्रियेसाठी वेळ लागतो. मार्च महिन्यांपासून कोरोनाने मृत्यूचे तांडव सुरू केले आहे. अशा परिस्थितीत आता मे महिना उजाडला असून, मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी सरकारने सवलत दिली आहे.
मजूर काम करण्यास तयार नाहीत
गेले ४६ दिवस संपूर्ण देश लाकडाउनमध्ये बंद आहे. मजूर कष्टकरी, कोरोना महामारीच्या भीतीपोटी कामांवर येण्यासाठी राजी होत नाहीत. अशा कठीण परिस्थितीत खारभूमी बंधाºयाची मजबुतीकरणाची कामे उरकण्यासाठी मनुष्यबळाअभावी यांत्रिक पद्धतीने मातीच्या भरावाने कामे उरकून समुद्रकिनारचे शेती संरक्षक बंधारे सक्षम, बळकट करण्यासाठी खारभूमी विभागातील अधिकाºयांनी कंबर कसली आहे.
या वर्षीच्या मान्सून हंगामापूर्वी ही संरक्षक तटबंदीची कामे करणे अत्यंत गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेऊन या सर्व बाबींचा विचार करून खारभूमी संरक्षक बंधाºयांच्या मजबुतीकरण कामे करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, शेतकरी खारभूमी विभागीय कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता गायकवाड व शाखा अभियंता यांच्याकडे कामे उरकून घेण्यासाठी गाठीभेटी घेतल्या आहेत.