15 जुलैपर्यंत सीएसएमटी-उरण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याची लगीनघाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 07:20 AM2023-07-03T07:20:28+5:302023-07-03T07:20:39+5:30

उरणकरांना मागील ५० वर्षांपासून नेरुळ-उरण रेल्वे मार्गाची प्रतीक्षा आहे.

Rush to resume passenger traffic on CSMT-Uran railway line by July 15 | 15 जुलैपर्यंत सीएसएमटी-उरण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याची लगीनघाई

15 जुलैपर्यंत सीएसएमटी-उरण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याची लगीनघाई

googlenewsNext

उरण : नेरुळ-उरण रेल्वे प्रवासी वाहतुकीचा मुहूर्त काढण्यात रेल्वे प्रशासन मश्गूल झाले आहे. सीएसटी ते उरण रेल्वे मार्गावरून प्रवाशांना घेऊन पहिली रेल्वे धावणार आहे. मागील ५० वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या  या मार्गावरून पहिल्यांदाच धावणाऱ्या या प्रवासी गाडीचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. १५ जुलैपर्यंत दहा दिवसात कधीही प्रवासी वाहतुकीचा मुहूर्त साधण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

उरणकरांना मागील ५० वर्षांपासून नेरुळ-उरण रेल्वे मार्गाची प्रतीक्षा आहे. १७८६ कोटी खर्चाचा २७ किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग  उरणकरांसाठी विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा   आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर काही तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीपासूनच या रेल्वे मार्गाचे काम अगदी रखडत-रखडत सुरू झाले होते, मात्र त्यानंतर त्यातील त्रुटी, तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्यानंतर नेरुळ-उरण रेल्वे मार्गाच्या कामाने वेग घेतला आहे. दरम्यानच्या काळात या रेल्वे मार्गावरील खारकोपर स्थानकापर्यंत प्रवासी वाहतूक सुरूही करण्यात आली आहे. त्यानंतर खारकोपर ते उरण स्थानकापर्यंत रखडलेली कामे वेगाने सुरू केली आहेत. 

वेगाने प्रगतिपथावर असलेल्या कामामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मागील तीन-चार वर्षांपासून या रेल्वे मार्गावरील कामे पूर्णत्वास नेऊन या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या अनेक डेडलाइन्स जाहीर केल्या होत्या. फेब्रुवारी, मार्च, मे २०२३ महिन्याच्या अखेरीस या रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून अनेक वेळा या मार्गावर ट्रायल रनही घेण्यात आली आहे, मात्र या खारकोपर ते उरण या दरम्यानच्या मार्गावरील अनेक कामे अपूर्ण आहेत.

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात होणार उद्घाटन?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवून सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. २० जुलैपासून पुढील २३ दिवस लोकसभेचे पावसाळी संसदीय अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान विविध कार्यक्रमांसाठी मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले जात आहे. या दौऱ्यादरम्यानच १५ जुलैपर्यंत सीएसटी ते उरण रेल्वे मार्गावरून प्रवाशांना घेऊन पहिली रेल्वे  प्रवासी वाहतुकीचा मुहूर्त साधण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.

Web Title: Rush to resume passenger traffic on CSMT-Uran railway line by July 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.