रायगड/पनवेल - रशिया युक्रेन युद्धाचा भडका उडाला आहे. या युद्धाचे पडसाद जगभर उमटले आहेत. भारताचे हजारो नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. त्यापैकी, 4 विद्यार्थी आपल्या घरी परतले आहेत. आपली मुले घरी सुखरुप परतल्यामुळे कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत, मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. मंगळवारी रायगड जिल्हा प्रशासनाने तीन विद्यार्थी घरी परतले असल्याची माहिती देत ,संबंधित विद्यार्थ्यांची यादी सार्वजनिक केली आहे. या तीन विद्यार्थ्यांमध्ये आर्यन राजेंद्र पाटील (पेण ), सालवा मोहम्मद सलीम धनसे (खोपोली), प्रचिती दीपक पवार (पनवेल ) ,पूर्वा पाटील (अलिबाग ) अशी या युक्रेन मधून परतलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.उर्वरित 28 विद्यार्थी अद्याप भारतात परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत.युक्रेन मधील परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे.रशियाने युक्रेनवर आपला मारा आणखी तीव्र केला आहे.सैन्यासह सर्वसामान्य नागरिक देखील या हल्ल्यात मृत्युमुखी पावत असल्याने युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत.मंगळवारी युक्रेन मध्ये भारतीय विद्यार्थी मिसाईल हल्ल्यात मृत्युमुखी पावल्याने युक्रेन मधील परिस्थिती चिघळली असल्याचे पहावयास मिळत आहे.युक्रेन मध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांची परराष्ट्र मंत्रालयाचा थेट संपर्क आहे.जिल्हा प्रशासन अथवा राज्य सरकारचे या विद्यार्थ्यांशी थेट संपर्क नसल्याने या विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधण्यास पालकांना देखील अडथळा निर्माण होत आहे.
बहुतांशी विद्यार्थी वादग्रस्त सीमेवर
युक्रेन मधील परिस्थिती पाहता अनेक विद्यार्थ्यांनी पायीच पोलंड,रोमानिया आदी देशांच्या सीमेकडे धाव घेतली आहेत.या सीमेवर काही विद्यार्थी अडकले आहेत.