दासगाव : महाड तालुक्यात अनेक गावांमध्ये बसविण्यात आलेले वीज खांब गंजलेले असून, जीर्ण झाले आहेत. याबाबत नागरिकांनी महाड महावितरण कार्यालयात अनेकदा तक्रारीही केल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. दासगाव मोहल्ला व बंदर रोड या ठिकाणी तीन खांब धोकादायक स्थितीत असून, कधीही कोसळण्याची भीती आहे. बंदर रोडच्या वीज खांबाजवळून सतत नागरिकांची वर्दळ असते. जवळच शाळा असल्याने दररोज शेकडो मुले शाळेत जाण्यासाठी याच मार्गावरून ये - जा करतात. जीर्ण वीज खांबासंदर्भात ग्रामस्थांनी तसेच दासगांव ग्रामपंचायतीमार्फत खांब बदलण्याची मागणी करण्यात येऊन देखील महावितरण महाड विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे विद्यार्थ्यांच्या जीवासही धोका आहे. बहुतेक गावांमध्ये ४० ते ५० वर्षांपूर्वीचे बसवण्यात आले आहेत. काही खांब खराब स्थितीत गंजून कोसळण्याच्या स्थितीत आहेत. दरवर्षी वीज खांब बदलण्यासाठी महावितरण टाळाटाळ करत आल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत महाड तालुक्यात जवळपास २५० वीज खांब गंजलेले आहेत. हे खांब बदलून नवीन खांब बसविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे त्याचा प्रस्ताव देखील पावसाळ्यापूर्वी पाठवण्यात आला आहे. दरवर्षी महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी वीज खांब बदलण्यासाठी निविदा तयार करण्यात येत असून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येते. मात्र निविदा मंजूरच केल्या जात नाहीत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या महाड तालुक्यातील आमसभेमध्ये तालुक्यातील अनेक नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. आमसभेला उपस्थित उपकार्यकारी अभियंता महेंद्र वाकपैजन यांनी लवकरच कामे हाती घेण्यात येणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली. भरवस्तीत असलेले जीर्ण वीज खांब कोसळल्यास मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
गंजलेले वीज खांब धोक्याचे
By admin | Published: July 15, 2016 1:38 AM