आगरदांडा : गणपती सणात प्रत्येक जण आपल्या घरी आणलेल्या गणपतीसाठी विविध पद्धतीने आरास करत असतो; परंतु या केलेल्या सजावटीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी मुरुड नगरपरिषदेमार्फत सजावट, उत्कृष्ट मूर्ती अशा स्पर्धांचे आयोजन करून विविध बक्षिसे दिली जातात. या वेळीसुद्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पाच दिवसीय नगराध्यक्ष चषकाचे मानकरी शेगवाडा येथील सचिन ठाकू र ठरले.
मुरुड-जंजिरा नगरपरिषद नगराध्यक्ष चषक २०१९ गणेशोत्सव स्पर्धेत पाच दिवसीय व दहा दिवसीय गणपती मूर्ती व सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या पाच दिवसीय गणेशमूर्ती व सजावट यामध्ये मुरुड शहरातील ३५गणेशभक्तांनी सहभाग घेतला होता. मूर्ती व सजावटीचे परीक्षण करण्यासाठी मुंबईमधून आकाशनंद हिरवे, तळामधून प्राध्यापक नानासाहेब यादव यांची परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन पाहणी करून मूर्ती व सजावटीमध्ये पहिला क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक यांच्या नावाची यादी मुरुड -जंजिरा नगरपरिषद कार्यालयात दिली. शुक्रवारी सकाळी मुरुड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष-स्नेहा पाटील व पर्यटन व नियोजन समिती सभापती पांडुरंग आरेकर व जनार्दन साठे यांच्या उपस्थित सील बंद लिफाफा खोलण्यात आला. त्यामध्ये मुरुड शेगवाडा येथील सचिन ठाकूर यांना सजावटीमध्ये गणपतीची सजावट करताना टाकाऊ कागदाचा वापर करून उत्तम सजावट केली होती. टाकाऊ कागदापासून बनवल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत नाही. हा कागद निसर्गात पूर्णता विलीन होतो, यांचा पर्यवरणाला कोणाताही धोका होत नाही, हा संदेश यामधून देण्यात आला आहे. परीक्षक व स्थानिक नागरिकांची दाद मिळवली होती. त्यांनी उत्तम पद्धतीने सजावट केल्याबद्दल प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. द्वितीय प्रेरणा चौलकर, तृतीय नीतेश पोकळ व उत्तेजनार्थ नथुराम कोतवाल यांना देण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी अमित पंडित, पर्यटन व नियोजन समिती सभापती पांडुरंग आरेकर, नगरसेवक विश्वास चव्हाण, नगरसेवक मनोज भगत आदी उपस्थित होते. सर्व विजेत्या स्पर्धकांचे नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी अभिनंदन केले आहे.स्पर्धेतील विजेतेप्रथम क्रमांक विजय भगत यांच्या निवासस्थानी असलेली मूर्ती (मूर्तिकार- नरेश डायला), द्वितीय क्रमांक - नीलेश भायदे यांच्या निवासस्थानी असलेली मूर्ती (मूर्तिकार जितेंद्र भाटकर), तृतीय क्रमांक नीलेश पुलेकर यांच्या निवासस्थानी असलेली मूर्ती (मूर्तिकार- संदीप मोकल), उत्तेजनार्थ मंगेश झावरे यांच्या निवासस्थानी असलेली मूर्ती (मूर्तिकार प्रसाद पाटील) हे विजयी स्पर्धक ठरले आहेत.