1008 कुंडी यज्ञात सामूहिक 50 हजार भक्तांची आहुती; अश्वमध यज्ञात पर्यावरण रक्षणाची मनोकामना
By वैभव गायकर | Published: February 24, 2024 04:55 PM2024-02-24T16:55:18+5:302024-02-24T16:55:35+5:30
यज्ञात आहुती देण्यासाठी औषधी वनपस्ती आणि गायीचा तूप याठिकाणी टाकला जात आहे. यामुळे उत्सर्जित होणाऱ्या अग्नीतून एक विशेष प्रकारची अशी वायु बाहेर पडत आहे.
पनवेल: गायत्री मंत्राचा उद्घोष करत खारघर शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य अश्वमेध यज्ञ सोहळ्यात 1008 कुंडी यज्ञात दररोज 50 हजार भक्तगण सहभागी होत आहेत. मंत्रोच्चाराच्या जयघोषात पर्यावरण शुद्धीची मनोकामना याठिकाणी केली जात आहे.
यज्ञात आहुती देऊन अश्वमेध यज्ञाद्वारे पर्यावरण रक्षण आणि अध्यात्मिक समाधान प्राप्त होत असल्याने मानवाचे जीवन कल्याण होते. या यज्ञाच्या आहुतील यज्ञोपाती नाव देण्यात आले असुन या सर्व प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी, बीआरसीच्या शास्त्रज्ञासह हरिद्वार येथील देव संस्कृती विश्व विद्यालयाचे पथक देखील याठिकाणी उपस्थित आहे. यज्ञात आहुती देण्यासाठी औषधी वनपस्ती आणि गायीचा तूप याठिकाणी टाकला जात आहे. यामुळे उत्सर्जित होणाऱ्या अग्नीतून एक विशेष प्रकारची अशी वायु बाहेर पडत आहे. यामुळे ओझोनचा थर वाढत असल्याचे देखील गायत्री परिवाराचे अतुल कुमार यांनी सांगितले. चार दिवसात दोन लाख भक्तांनी 1008 कुंडी यज्ञात आपला सहभाग नोंदवला आहे. दररोज दिवसभरात पाच ते सहा फेऱ्यांमध्ये सामूहिक यज्ञात आहुती दिली जात आहे. देशभरातील भक्तगण या सोहळ्यात सहभागी होत आहेत ते आवर्जून 1008 कुंडी यज्ञात सहभागी होत आहेत.
खारघर शहरात दि.21 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला भाजप अध्यक्ष जी पी नड्डा,केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोठ्या प्रमाणात व्हीआयपीनी हजेरी लावली आहे.विशेष म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच भव्य अशा अश्वमेध यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.उत्तर भारतात गायत्री परिवाराचे मोठे अनुयायी आहेत.
नव्याने यज्ञोपाती हि उदयास येत आहेत.अश्वमेध यज्ञाचा भाग असलेल्या 1008 कुंडी यज्ञात दिल्या जाणाऱ्या आहुतीत औषधी वनस्पती आणि शुद्ध गायीच्या तुपामुळे विशेष प्रकारची ऊर्जा उत्सर्जित होत आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होत आहे.यज्ञात सहभागी होणारे भाविकांच्या मनाची देखील शुद्धी याठिकाणी होत आहे.
- आतुल कुमार (समन्वयक, अश्वमेध यज्ञ सोहळा )