'साध्वी प्रज्ञा सिंह जेलबाहेर आल्या कशा?'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 01:05 AM2019-04-22T01:05:57+5:302019-04-22T07:15:32+5:30

जयंत पाटील यांची घणाघाती टीका

'Sadhvi Pragya Singh came out of jail?' | 'साध्वी प्रज्ञा सिंह जेलबाहेर आल्या कशा?'

'साध्वी प्रज्ञा सिंह जेलबाहेर आल्या कशा?'

Next

मुरुड : राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार जेव्हा महाराष्ट्रात होते, तेव्हा मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह या जेलमध्ये होत्या; परंतु भाजप व शिवसेनेची सत्ता येताच त्या जेलबाहेर येतात. त्या जेलबाहेर कशा आल्या, त्यांना मुक्त कोणी केले याचा खुलासा राज्य सरकारने करणे खूप आवश्यक आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीस भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून खासदारकीचे तिकीट देऊन या गोष्टीचे समर्थन राज्याचे मुख्यमंत्री करीत असतील तर या राज्यकर्त्यांची नैतिकता लयास गेली आहे. संसदेत भगवे कपडे घालणाऱ्यांना प्रवेश देण्याचे धोरण स्वीकारणाºया विद्यमान भारतीय जनता पक्षाच्या या धोरणाला जोरदार विरोध करून मुंबईचे संरक्षण करीत असताना हेमंत करकरे हे शहीद झाले होते.त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून संपूर्ण पोलीस दलाचा अवमान साध्वी प्रज्ञा सिंह यांनी करून सुद्धा समर्थन करणाऱ्या भाजपला लोक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुरुड शहराच्या जाहीर सभेत केले.

या वेळी जयंत पाटील म्हणाले की, २८ टक्के जीएसटीमुळे संपूर्ण व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले असून जेव्हा मोदी सत्तेच्या बाहेर होते तेव्हा याच जीएसटीला विरोध केला होता. आमच्या काळात आम्ही व्हॅल्यू एडीट टॅक्सला सहमती दिली होती. हा टॅक्स व्यापारी वर्गाला परवडत होता; परंतु काही तरी वेगळे करून दाखवण्याच्या नादात एकतर्फी निर्णय घेऊन जीएसटी अमलात आणून संपूर्ण व्यापारी वर्गाची नाराजी ओढवून घेतली आहे. या महाराष्ट्रामधून शिवसेनेचे खासदार सर्वात कमी निवडून येणार आहेत. जे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे नेतृत्व असताना जे बोलत होते तेच करीत होते; परंतु उद्धव ठाकरे आपली सारखी भूमिका बदलत आहेत. यामुळे सामान्य शिवसैनिक बुचकळ्यात सापडला असून तो शिवसेनेपासून दुरावला आहे.त्यामुळे यंदाच्या या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वात कमी खासदार निवडून येतील असे भाकीत त्यांनी केले. आमचे सरकार जर केंद्रात आले तर तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन दिलासा देऊ.

२०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत भारत देशावर ३१ लाख कोटी रु पयांचे कर्ज चढले असून मी या सभेद्वारे मोदींना प्रश्न विचारू इच्छितो की हे ३१ लाख गेले कुठे? कशावर खर्च करण्यात आले याचा देशातील जनतेला हिशोब द्या. या सरकारने मेक इन इंडिया नावाचा कार्यक्र म राबवला; परंतु याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.भाजपचे सरकार फसवे असून खरी माहिती लोकांपुढे आणत नाही. या देशातून कर्ज बुडवणाºयांची संख्या ३६ असून फक्त प्रसार माध्यमांसमोर विजय मल्ल्या, नीरव मोदी यांचीच नावे दाखवली जात आहेत;परंतु सुप्रीम कोर्टात अंमलबजावणी संचालनालय यांनी ३६ लोकांनी बँकांना डुबवल्याचा अहवाल सादर केला आहे. अफरातफर करून लोक विदेशात पळून जात असतील तर या देशाचा चौकीदार म्हणवणारे पंतप्रधान काय करीत आहेत असा प्रश्न या वेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केला. या वेळी रायगड जिल्हा काँग्रेस आयच्या महिला अध्यक्ष श्रद्धा ठाकूर, तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, शेकाप तालुका चिटणीस मनोज भगत, मुरुड तालुका काँग्रेस आय पक्षाचे अध्यक्ष सुभाष महाडिक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: 'Sadhvi Pragya Singh came out of jail?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.