जयंत धुळप /अलिबाग
रायगड - मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात महाड जवळील मोहोप्रे येथे गांधारी नदीवरील जुन्या पुलाशेजारी नवीन पुलाचे काम सुरू आहे. या कामाचेवेळी नदीच्या पात्रातील पिलरच्या उभारणीसाठी खणलेल्या खड्ड्यात नदीपात्रातील मगर घुसल्याने कामगारांमध्ये घबराट निर्माण झाली होती. वनखात्याच्या महाड विभाग आणि सिस्केप संस्था यांच्या सहकार्याने या मगरीचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले असून मगरीच्या या स्थलांतर मोहिमेत सिस्केपच्या नवीन सदस्यांनी विशेष मेहनत घेतली होती.
मगरींच्या आश्रयस्थानासाठी महाड येथील सावित्री आणि गांधारी या नद्यांची नवी ओळख निर्माण झाली आहे. सावित्रीनदीच्या उथळ पात्राच्या काठावर मगर पाहणे हा अनेकांचा छंद झालेला आहे. या नद्यांमध्ये एकीकडे मासेमारी आणि जवळच मगरींचे वास्तव्य असेही चित्र पाहायला मिळत असल्याने या मगरी हिंस्त्र प्रजातीमध्ये मोडत नाहीत. तरीही मगर म्हटली की जी स्वाभाविक भिती असते ती मात्र प्रत्येकजणाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. पण, सिस्केप संस्थेच्या प्रबोधनामुळे पात्रातून बाहेर आलेल्या अनेक मगरींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे सोपे होत आहे. आज महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात मोहोप्रे जवळील गांधारी नदीवरील नवीन पुलाच्या कामामध्ये एक मगर दिसल्याने काम ठप्प झाले होते. वनखात्याशी संपर्क साधल्यानंतर सिस्केप संस्थेचे योगेश गुरव, प्रणव कुलकर्णी, मित डाखवे, ओम शिंदे, अक्षय भोवरे, ओमकार वारणकर, नितीन कदम व इतर सदस्य हे घटनास्थळी पोहचले. यांच्यासोबत वनखात्याचे श्री. पी. डी. जाधव व श्री. पाटील होते. दोरखंडाच्या सहाय्याने मगरीचे तोंड बंद करून तिला पोत्यामध्ये बांधण्यात आले. सिस्केपच्या नवीन सदस्यांनी याआधी मगरीच्या रेस्क्यू आँपरेशनमध्ये सहभाग घेतला नसल्याने त्यांच्यासाठी हा पहिलाच प्रसंग होता. योगेश गुरव, मित्र डावे, प्रणव कुलकर्णी हे प्रशिक्षीत असल्याने त्यांनी पहिला टप्पा पार केल्यानंतर नवीन सदस्यांनी मगरीला बांधण्यासाठी मदत केली. त्यानंतर या मगरीचे स्थलांतर महाड स्मशानभूमीच्या मगरींच्या वसाहतीजवळील सावित्रीनदीत तिला सुरक्षित सोडण्यात आले. ही मगर साडेसात फुट लांब मादी जातीची होती.
सावित्री व गांधारी नदीच्या पात्रात महाड ते म्हसळा परिसरापर्यंत या गोड्या पाण्यातील मगरींच्या प्रजातीची संख्या खूप वाढत आहेत. या वाढत्या संख्येमुळे त्यांचे नैसर्गिक स्थलांतर अनेक पाणथळ भागात होत असते. विणीच्या हंगमात नर जातीचा मगर हा त्याच्यापेक्षा लहान असलेल्या मगरींना त्याच्याजवळून दूर पळवत असतो. याचवेळी नदीच्या पात्राजवळील बंद असलेल्या दगडांच्या खाणीतील डबके, तलाव, शेततळी अशा पाणी असलेल्या ठिकाणी त्यांचे स्थलांतर होत असते. जमिनीवरून चालत ते हे स्थलांतर करीत असतात. साधारण हा विणीचा हंगाम जानेवारी महिन्यापासून सुरू होतो. मे महिन्याच्या आसपास अंड्यांतून पिल्ले बाहेर येत असतात. विणीच्या हंगामातच मगरी या जास्त आक्रमक असू शकतात. त्यामुळे शक्यतो जानेवारी पासून चार महिने मासेमारी करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यामुळे मगरी आणि मनुष्य दोन्हींचे संरक्षण होईल अशी माहिती सिस्केप संस्थेचे योगेश गुरव यांनी दिली. आज झालेल्या मगरीच्या स्थलांतरादरम्यान नागरीकांनी व तेथील कामगारांनी गर्दी केली होती. सिस्केपच्या नवीन सदस्यांनी या मगरीच्या स्थलांतर मोहिमेत भाग घेतल्याने मगरींबाबतची भिती दूर होण्यास मदत झाली असून महाड ते म्हसळा तालुक्यात कुठेही अशा मगरी आढळून आल्यास महाडच्या सिस्केप संस्थेशी संपर्क साधावा, असे सिस्केप संस्थेचे प्रणव कुलकर्णी यांनी म्हटले आहे.