- मुकुंद रांजणे माथेरान : माथेरानमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येत असले तरी परिसरातील डोंगर दऱ्यांमध्ये राहणारे स्थानिक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पर्यटनाला चालना मिळण्यासाठी सरकारकडून याठिकाणी विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, स्थानिकांना रोजीरोजी, वाहतुकीसाठी अद्याप पुरेशी साधने नाहीत. त्यामुळे त्यांच्या वाहतूक व्यवस्थेबाबतची विघ्ने अद्याप संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत.रविवारी सकाळी सहा वाजता माथेरानहून कर्जतकडे रवाना होणाºया मिनीबसलाअपघात झाला. बस अवघड वळणावरील सुरक्षा कठड्यावर आदळली. अरुंद रस्त्यामुळे याठिकाणी चालकांना वाहन चालवताना नेहमीच कसरत करावी लागते. कठड्यावर आदळल्याने बस थोडक्यात वाचली, अन्यथा दरीत कोसळली असती. या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.हरित लवादाच्या अटी-शर्थींमुळे वनखात्याकडून रस्ता दुरु स्तीसाठी परवानगी दिली जात नाही. त्यामुळे परिसरात वाहनांची वर्दळ वाढली तरी रस्ते मात्र अरुंदच आहेत. शिवाय रस्त्यांची डागडुजी होत नसल्याचे दुरवस्था झाली आहे. एकीकडे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेला नवीन बोगद्यासाठी वनखात्याची परवानगी दिली जाते. इको झोनमध्ये मुंबईतील आरे कॉलनीतील मेट्रो डेपोच्या विकासासाठी अडथळा ठरणारी झाडे छाटून त्याजागी वनखात्याने परवानगी राज्य शासनाकडून मिळवलेली आहे. मग माथेरानसारख्या पर्यटन स्थळाकरिता दुजाभाव का केला जात आहे, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे.स्थानिकांनी वारंवार केलेल्या मागणीनंतर कर्जत- माथेरान ही मिनीबस सेवा शासनाने सुरू केली खरी, परंतु काहीना काही कारणास्तव या सेवेत नेहमीच विघ्ने येत आहेत. माथेरानच्या घाटरस्त्यावर अरुंद रस्ते व अवघड वळणांमुळे चालकांना गाडीवर ताबा नियंत्रण मिळवताना अनेकदा अडचणी येतात. कर्जत- माथेरान मार्गावर नव्याने दोन बसेस देण्यात आल्या आहेत, परंतु एकच गाडी नियमितपणे सेवा देत असून दुसरी गाडी कर्जत ते पनवेल अशी चालविली जात आहे.
माथेरानमध्ये मिनीबसची सुरक्षा कठड्याला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:27 PM