रायगडमध्ये ४० पंचायत समित्यांवर भगवा
By admin | Published: February 24, 2017 07:51 AM2017-02-24T07:51:21+5:302017-02-24T07:51:21+5:30
जिल्ह्याच्या ११८ पंचायत समित्यांपैकी तब्बल ४० पंचायत समितीवर शिवसेनेने
अलिबाग : जिल्ह्याच्या ११८ पंचायत समित्यांपैकी तब्बल ४० पंचायत समितीवर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित करुन भगवा फडकविला आहे. शेकापने ३३ पंचायत समिती जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस २४, काँग्रेस १० आणि भाजपाने नऊ पंचायत समित्यांवर विजय प्रस्थापित केला आहे. शिवसेनेने शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समित्यांवरील वर्चस्व मोडीत काढले आहे.
पनवेल तालुक्यातील १६ पैकी सात जागा शेकापने जिंकल्या आहेत. त्यामुळे पनवेलवर शेकापचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. भाजपाला सहा, तर काँग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तेची चावी कोणाकडे जाते हे लवकरच कळणार आहे. कर्जत तालुक्यामध्ये शिवसेनेने सर्वाधिक सात जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांनी निर्विवाद सत्ता मिळणार आहे. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे दोन, तीन जागा जिंकता आल्या आहेत.
खालापूरमध्ये शिवसेनेला तीन, शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी दोन, तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. उरण तालुक्यामध्ये शेकापने चार आणि शिवसेना-भाजपाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे शेकापला कोणत्याही एका पक्षाची मदत घेऊन सत्ता स्थापन करता येणार आहे. पेण तालुक्यामध्ये दहा पैकी सात जागांवर शेकापने लाल बावटा फडकविला आहे, तर दोन शिवसेना आणि एक जागा काँग्रेसला मिळाली आहे. तेथे शेकापला जनतेने थेट बहुमताचा कौल दिल्याने तेथे सत्ता स्थापन करता येणार आहे.
पालीमध्ये शेकाप आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. मुरुडमध्ये दोन शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. माणगाव तालुक्यात शिवसेनेला पाच जागा देऊन सत्तेची चावी मतदारांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेने धुळ चारल्यामुळे केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. पोलादपूरमध्ये काँग्रेसला दोन आणि शिवसेना शेकापला प्रत्येकी एक जागा प्राप्त झाली आहे.
रोहे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागा जिंकून वर्चस्व राखले आहे. शेकाप, शिवसेनेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे. महाडमध्ये शिवसेनेने काँग्रेसला धूळ चारली आहे. तेथे तब्बल १० जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला सरळ बहुमत दिले आहे. काँग्रेसला एकच जागा प्राप्त झाली आहे.
म्हसळा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने गड राखत चार जागा जिंकून निर्वीवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. श्रीवर्धन तालुक्यामध्ये शिवसेनेला तीन जागा तर, राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. तळा तालु्कायमध्ये मात्र चारही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकून एक हाती सत्ता मिळवली
आहे.
अलिबाग तालुक्यामध्ये शेकाप आठ, शिवसेना तीन, काँग्रेस दोन, भाजपाला एक जागा मिळाली. शेकापला एका जागेचा फायदा झाला आहे, त्यामुळे सत्ता स्थापन करणे सोपे झाले आहे. (प्रतिनिधी)
ओसवाल यांचा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
पाली : प्रकृती अस्वास्थामुळे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असलेल्या वसंतराव यांनी बरेच वेळा प्रांतिकचे अध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्याकडे राजीनामा देण्याबाबत बोलणी केली होती; परंतु वरिष्ठ, एकून न घेता आपण जबाबदारी सांभाळा, असा आग्रह धरत होते. यानंतर रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता राजीनामा देणे पक्षाच्या दृष्टीने योग्य होणार नाही म्हणून या निवडणुका होईपर्यंत थांबलो होतो, असे वसंतराव ओसवाल म्हणाले. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होताच, पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा वसंतराव ओसवाल यांनी दिला आहे. राजीनामापत्र प्रांतिकचे अध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्याकडे पाठविला असल्याचे वसंतराव ओसवाल यांनी सांगितले. याचबरोबर पनवेल महानगरपरिषद निवडणुकीच्या अध्यक्षपदाचासुद्धा राजीनामा याबरोबर पाठविला आहे.
वसंतराव ओसवाल म्हणाले की, ‘माझा राजीनामा व रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल यांचा काहीही संबंध नाही, मला आता वाढत्या वयोमानामुळे व प्रकृती अस्वास्थामुळे पक्षाला न्याय देण्याचे काम समाधानकारक करता येत नसल्याने मी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. राजीनाम्यानंतर पुढे सर्व शैक्षणिक क्षेत्रात काम करून गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत करेन,’ असा मनोदय वसंतराव ओसवाल यांनी या वेळी व्यक्त केला.
गेल्या अनेक वर्षांच्या प्रवासात प्रांतिकचे अध्यक्ष आमदार सुनील तटकरे, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि आमदार धैर्यशील पाटील यांचे सहकार्य मिळाले, याबद्दल ओसवाल यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
अलिबागेत पुन्हा लालबावटा
अलिबाग : रायगड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत अलिबाग तालुक्यात शेकापने सातपैकी शहापूर, कुडूर्स, मापगाव चेंढरे आणि बेलोशी या पाच मतदार संघावर आपले वर्चस्व प्राप्त केले, तर शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत थळ, चौल मतदार संघावर वर्चस्व पात्र केले. रात्री उशिरापर्यंत बेलोशी मतदार संघाचा निकाल लागला नव्हता. सर्वाचे लक्ष लागलेल्या थळ मतदार संघात शिवसेनेच्या मानसी दळवी यांनी शेकापच्या चित्रा पाटील यांना विक्रमी मतांनी धुळ चारली.
निकाल घोषित होताच लालबावटा जसा फडकला त्याच त्वेषाने शिवसनेचा भगवाही फडकला. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. त्यांनी फटाके वाजवून आपला आनंद साजरा केला.
शेकापच्या शहापूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार सुश्रूता पाटील यांना १० हजार २४६ मते मिळाली, त्यांनी काँग्रेसच्या उज्ज्वला पाटील यांचा दोन हजार २६ मतांनी पराभव केला, त्यांना आठ हजार २२० मते मिळाली. कुडूर्स मतदार संघात शेकापच्या चित्रा पाटील यांनी शिवसेनेच्या पल्लवी पाटील यांना तब्बल सात हजार १४६ मतांनी आसमान दाखविले. चित्रा पाटील यांना १२ हजार २४८ मते मिळाली, तर पल्लवी यांना पाच हजार १०२ मतांवर समाधान मानावे लागले. मापगाव मतदार संघामध्ये शेकापच्या दिलीप भोईर यांना १० हजार १४७, तर काँग्रेसचे राजेंद्र ठाकूर यांना नऊ हजार ५५९ मते मिळाली. भोईर यांनी ५८८ मतांनी ठाकूर यांचा पराभव केला.
जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या थळ मतदार संघामध्ये शिवसेनेच्या मानसी दळवी यांना विक्रमी १३ हजार ४७६ मते मिळाली त्यांनी शेकापच्या चित्रा पाटील यांचा तब्बल सहा ४४७ मतांनी धूळ चारली. चित्रा यांना सात हजार २९ मते प्राप्त झाली. चित्रा या कुडूर्स आणि थळ अशा दोन्ही मतदार संघातून निवडणूक लढवली. चेंढरे मतदार संघामध्ये नऊ हजार ६३७ मते मिळाली काँग्रेसच्या श्रीमंती मगर यांना पाच हजार ५५५ मते मिळाली. मगर यांना चार हजार ८२ मते कमी मिळाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या चौल मतदार संघात शिवसेना विजयी. सुरेंद्र म्हात्रे यांना नऊ हजार ६३९, तर शेकापचे नंदू मयेकर यांना आठ हजार २०४ मते मिळाली. १४३५ मतांनी मयेकर यांचा पराभव झाला. बेलोशी मतदार संघात शेकापचे मधू पारधी यांना १०४३० मते तर जयवंत लेंडी कॉग्रेस यांना ८७७५ मते मिळाली.
सारळ, शहापूर, आंबेपूर, कुडूर्स, आवास, मापगाव खंडाळे पंचायत समिती गणावर शेकापने वर्चस्व प्रस्थापित केले. थळ, वरसोली, चेंढरे गणावर शिवसेनेने भगवा फडकविला. चौल आणि रेवदंडा गणाचा गड अनुक्रमे काँग्रेस आणि भाजपाने काबीज केले. रामराज आणि बेलोशी गणाची मतमोजणी सुरु होती.
अलिबागचे प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे यांच्या संथगतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सकाळी १० वाजता सुरु झालेली मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. पहिल्या फेरीचा निकाल यायला सुमारे दुपारचे दीड वाजले होते. मतमोजणीचे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्याने उमेदवार, पोलीस, मतदान कर्मचारी, कार्यकर्ते आणि पत्रकार यांना ताटकळत बसावे लागले. अलिबागच्या निवडणूक यंत्रणेला प्रशिक्षण दिले होते की नव्हते, अशी चर्चा मतमोजणीच्या ठिकाणी होती.