रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ‘सहकारमहर्षी’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:32 PM2018-10-31T23:32:18+5:302018-10-31T23:32:32+5:30

सहकार क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार; बदलत्या काळात बदलती धोरणे ठेवल्याने मिळाले यश

Sahakar Mahashree Award for Raigad District Central Co-operative Bank | रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ‘सहकारमहर्षी’ पुरस्कार

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ‘सहकारमहर्षी’ पुरस्कार

googlenewsNext

अलिबाग : महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘सहकारमहर्षी’ हा राज्यातील सहकार क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मुंबई वांद्रे रिक्लमेशन येथील रंगशारदा सभागृहात आयोजित विशेष सोहळ्यात राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, जि.प. माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, बँकेचे संचालक नृपाल पाटील, आस्वाद पाटील, प्रशांत नाईक, अ‍ॅड.परेश देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजवर राष्ट्रीय तसेच देशपातळीवरील अनेक पुरस्कार पटकाविले असून राज्याच्या सहकार क्षेत्रामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. सहकाराच्या विकासाचा रायगड पॅटर्नचे अवलोकन राज्यातील सर्वच जिल्हा बँकांनी करावे, असेही या वेळी नमूद केले. ‘सहकारमहर्षी’ हा राज्यातील सर्वोच्च पुरस्कार असून राज्यातील एकूण दोन लाख ३८ हजार संस्थांमधून ‘सहकारमहर्षी’ या पुरस्काराकरिता निवड केली जाते. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या सर्वच सहकारी संस्थांमधून प्रथम क्रमांक मिळवल्याचे सांगितले.

बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पुरस्काराला उत्तर देताना कोकणामध्ये सहकार रु जत नाही असा समज असताना राज्यातील सर्वोच्च ‘सहकारमहर्षी’ हा बहुमान रायगड जिल्हा मध्य.सहकारी बँकेच्या रूपाने कोकणाला प्राप्त होत आहे त्याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला आणि बँकेच्या शेतकरी आणि सामान्य ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे बँकेला हा पुरस्कार मिळाला असून त्यांच्यासमवेत काम करणारे बँकेचे सर्व संचालक आणि बँकेचे कर्मचारी यांचे अभिनंदन त्यांनी यावेळी केले. या वेळी व्यासपीठावर आमदार अ‍ॅड.आशिष शेलार,राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार प्रवीण दरेकर, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, सहकार आयुक्त सतीश सोनी, विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर आदी उपस्थित होते.

५ वर्षांमध्ये ५० कोटींपर्यंत ढोबळ नफा
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची या दशकातील कामगिरी ही थक्क करणारी असून बँकेने आजवर आपल्या सांपत्तिक स्थितीमध्ये सातत्याने आॅडिट वर्ग अ संपादन करीत मागील ५ वर्षांमध्ये ५० कोटींपर्यंत ढोबळ नफा मिळविला आहे. बँकेचा आजचा व्यवसाय हा ३२०० कोटींच्या पुढे असून रिझर्व्ह बँक, नाबार्ड तसेच शासन पातळीवरील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेच्या कामकाजाचे कौतुक केले आहे.
सहकार क्षेत्राला अधिक मजबूत बनविण्यासाठी बँकेचे योगदान फार महत्त्वाचे ठरले आहे. बँकेचे संगणकीकरण ज्यामध्ये स्वत:चे डेटा सेंटर तसेच जिल्ह्यातील इतर सहकारी बँकांना याचा फायदा व्हावा याकरिता डेटा सेंटर शेरिंगसारखी सुविधा, आय.एस.ओ.९००१-२०१५ प्रमाणपत्र या सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा ग्राहकांना उपयोगिता सिद्ध करून दाखवू शकतात आणि बदलत्या काळात बदलती धोरणे समोर ठेवून बँकेने हे सिद्ध केले आहे.

Web Title: Sahakar Mahashree Award for Raigad District Central Co-operative Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.