आरडीसीसी बँकेला सहकारमहर्षी पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 03:04 AM2018-10-21T03:04:05+5:302018-10-21T03:04:14+5:30

महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘सहकारमहर्षी’ हा सर्वोच्च पुरस्कार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (आरडीसीसी)ला जाहीर झाला आहे.

Sahki Naharni Award for RDCN Bank | आरडीसीसी बँकेला सहकारमहर्षी पुरस्कार

आरडीसीसी बँकेला सहकारमहर्षी पुरस्कार

Next

- जयंत धुळप 
अलिबाग : महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘सहकारमहर्षी’ हा सर्वोच्च पुरस्कार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (आरडीसीसी)ला जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, २०१२-१३ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे पुरस्कार सुरू करण्यात आले असून, २०१२-१३ मध्ये आरडीसीसी बँकेला ‘सहकारनिष्ठ’, २०१३-१४ मध्ये ‘सहकारभूषण’ हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
‘सहकारमहर्षी’ हा सहकार क्षेत्रातील राज्यातील सर्वोच्च पुरस्कार असून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांमधून या पुरस्काराकरिता निवड केली जाते. यामध्ये राज्यातील गृहनिर्माण संस्था, साखर कारखाने, सूतगिरण्या, डेअरी, मल्टीस्टेट सहकारी बँका, हातमाग, यंत्रमाग, पणन अशा विविध एकूण २ लाख ३८ हजार सहकारी संस्था असून, त्यात शिखर संस्था, प्राथमिक कृषी पतसंस्था, बिगर कृषी पतसंस्था, पणन संस्था, शेतीमाल प्रक्रि या उपक्रम संस्था, सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बँका, नागरी पतसंस्था, नोकरदारांच्या संस्था, सहकारी दुग्ध संस्था या सर्वांमधून ‘सहकारमहर्षी’ हा पुरस्कार निवडला जात असून, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या सर्वच सहकारी संस्थांमधून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
१९९७ मध्ये आमदार जयंत पाटील यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची धुरा सांभाळल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने आजवर सहकारी क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली असून, बँकेच्या ५८ शाखांच्या माध्यमातून मार्च २०१८अखेर ३२०० कोटींचा टप्पा पार केला आहे. तर २००८ मध्येच बँकेने संगणकीकरण पूर्ण करून जिल्ह्यातील आपल्या सर्व ग्राहकांना अत्याधुनिक सेवा द्यायला सुरु वात केली. बँकेने देशामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या साहाय्याने कर्जवाटप सुरू केले. स्वखर्चाने रायगड जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी संस्थांचे संगणकीकरण करणारी आरडीसीसी बँक ही पहिली जिल्हा सहकारी बँक ठरली आहे. ३१ मार्च २०१८ पूर्वीच जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी संस्थांचे संगणकीकरण पूर्ण केले असून, त्या संस्थांना बँकेच्या माध्यमातून हार्डवेअर उपलब्ध करून दिले आहे.
नाबार्डकडून आरडीसीसी बँकेवर चित्रफित
आरडीसीसी बँकेच्या कामगिरीची दखल घेऊन, नाबार्डच्या वतीने बँकेवर एक चित्रफित तयार करून ती देशभर प्रसारित करण्यात आली आहे.
त्याचबरोबर देशातील प्रमुख बँकांचे अधिकारी, नाबार्ड, रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया यामधील सर्वोच्च अधिकारी यांनी आरडीसीसी बँकेला भेट देऊन बँकेच्या कार्यप्रणालीचा गौरव केला आहे.
बँकेने ग्रामीण भागात महिलांना संघटित करून स्थापन केलेल्या १७ हजारांहून जास्त बचतगटांच्या माध्यमातून दोन लाखांपेक्षा अधिक महिलांना बँकेने एकत्र करून त्यांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळवून दिला आहे.

Web Title: Sahki Naharni Award for RDCN Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.