पाली : जगभर प्रसिद्ध असलेले पल्लीपूर (पाली) नगरीतील अष्टिनायक श्रीबल्लाळेश्वर बाप्पा यांचे जन्मोत्सवनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून श्रीबल्लाळेश्वर बाप्पाचे दर्शन घेण्यास भक्त गणांच्या रांगाच रांगा लागत आहेत. माघी गणेशोत्सव मंगळवारी २८ जानेवारीला सुरू होत असल्याने मंदिरातील आवारातील ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे.गाभाऱ्यात डोळ्यांची पारणे फेडणारे फुलांची सजावट व विद्युत रोशणाई पाहतच राहावी अशी केली आहे. या फुलांची सजावट व विद्युत रोशणाईने सजवलेल्या श्रीबल्लाळेश्वर मंदिराचे दुश्य कॅमेरात कैद करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.माघी उत्सवानिमित्त दर्शनासाठी दोन ते तीन लाख भक्तगण येत असतात. या श्रीबल्लाळेश्वराची महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण जगभर ख्याती आहे. उत्सवात अनेक प्रकारची २०० ते ३०० दुकाने सुसज्ज अशी मांडली असून, त्याचबरोबर लहान मुलांना व हौशी तरुण व तरुणींना आकाश पाळणे, झुकझुक गाडी, घोडागाडी आदी प्रकारचे मनोरंजक खेळ पाहायला मिळतात. या उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक भाविक येत असून, या उत्सवाची शोभा वाढवत आहेत. सर्व भक्तांना श्रीबल्लाळेश्वर प्रसन्न व्हावा, असे देवस्थानच्या वतीने श्रीबल्लाळेश्वर चरणी निवेदन मांडले जाते.माघी गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाच्या वतीने भिरा, रवाळजे, नांदगाव विभागासाठी स्थानक मंदिराच्या मागच्या बाजूस केले असून, वाकण-रोड-पाली विभागासाठी स्थानक शैलेश धारिया यांच्या जागेत, तर पाली-खोपोली विभागासाठी भोसले व राठोड यांच्या जागेत करण्यात आली आहे, तसेच उत्सवासाठी आॅनलाइन आरक्षणाची आणि जादा गाड्यांची सुविधा करण्यात आली आहे. ग्रामपंचायत वतीने पाणीपुरवठा, तसेच स्वच्छतेची जबाबदारी घेतली. डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली व पाली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली चार उपनिरीक्षक व दीडशे पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेसाठी पाली पोलीस ठाण्याने जादा कुमक मागविली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेत आहेत.
श्रीबल्लाळेश्वर उत्सवानिमित्त सजली पाली नगरी; डोळ्यांचे पारणे फेडणारी फुलांची सजावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 6:00 AM