उरण : उरणमध्ये लॉकडाउनचा गैरफायदा घेत ठेकेदाराकडून आदिवासींच्या रहदारीसाठी रायगड जिल्हा परिषदेमार्फत बांधण्यात येणाऱ्या चिरनेर-आक्कादेवी आदिवासीवाडी दरम्यान साकवाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. आदिवासींच्या वर्दळीसाठी उपयुक्त ठरणाºया साकवाच्या कामासाठी पावणेआठ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कामाचा दर्जा खालावला असून अतिवृष्टीत कधीही कोसळण्याची भीती आदिवासींकडून व्यक्त केली जात आहे.
उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत आक्कादेवी माळरानावर सुमारे २०० जणांची वस्ती आहे. चिरनेर जंगल सत्याग्रहातील आक्कादेवी माळरानही ऐतिहासिक ठिकाण आहे. याच ठिकाणी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचेही स्मारक असून दरवर्षी ३० सष्टेंबर रोजी हुतात्मा दिनाच्या निमित्ताने अभिवादन, मानवंदना देण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येतो.
आक्कादेवी माळरानावर वास्तव्य करणाºया ग्रामस्थांना रस्त्यात येणारे वाहते नाले पार करून ये-जा करावी लागते. पावसाळ्यात नाले तुडुंब भरून वाहत असल्याने वर्दळ करणे अवघड होते. शिवाय जीवासही धोका संभवतो. आदिवासींची समस्या हेरून रायगड जिल्हा परिषदेमार्फत चिरनेर - आक्कादेवी आदिवासीवाडी साकव बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
उभारण्यात येत असलेल्या सुमारे १५ मीटर लांबीच्या साकवाच्या बांधकामासाठी ७ लाख ७६ हजार ८४३ खर्चाच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून ठेकेदाराने कामालाही सुरुवात केली आहे. मात्र लॉकडाउनचा गैरफायदा उठवत ठेकेदाराकडून साकवाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. पीसीसी, स्टील, सिमेंट, काँक्रीटच्या बांधकामात चक्क दगड, माती आणि तत्सम निरुपयोगी सामानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
एम-१२, एम-१५, एम-२०, एम-३५ आदी ग्रेडमधील बांधकामात निविदाप्रमाणे वायब्रेटिंग, क्युरिंग, सेंटरिंग आदींचा ठेकेदाराकडून वापरच केला जात नाही. कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत येथील काही आदिवासींनी उरण पंचायत समिती आणि राजिप सदस्यांच्या भेटीगाठी घेऊन माहिती देऊन नाराजी व्यक्त केली आहे.
राजिप सदस्य विजय भोईर यांनी ही गंभीर बाब राजिप मुख्याधिकारी दिलीप हळदे यांच्याही निदर्शनास आणून दिली आहे. अद्यापही कारवाई केली नसल्याचे आदिवासींकडून सांगण्यात येत आहे. अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराला एक प्रकारे पाठबळच मिळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात दुर्घटना झाल्यास त्यास संबंधित अधिकारी, ठेकेदार जबाबदार असतील, सरकारचा आदिवासींच्या विकासासाठी लाखोंचा होणारा खर्चही पाण्यात जात असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत.
मुख्याधिकाºयांच्या आदेशानंतर कारवाई
च्चिरनेर - आक्कादेवी आदिवासीवाडी दरम्यान साकवाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत राजिप मुख्याधिकारी दिलीप हळदे यांच्या आदेशानंतर चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना राजिपचे पनवेल-उरण विभागाचे उपअभियंता बारदेशकर यांना दिल्याची माहिती राजिपचे अतिरिक्त मुख्याधिकारी रणधीर सोमवंशी यांनी दिली.