साळाव-रेवदंडा खाडीपुलाचा कठडा तुटला
By Admin | Published: August 18, 2015 02:59 AM2015-08-18T02:59:24+5:302015-08-18T02:59:24+5:30
रायगड जिल्ह्यातील साळाव-रेवदंडा खाडीपुलामुळे अलिबाग, मुरु ड व रोहा हे तीन तालुके जवळ आलेत. परंतु पुलाचा कठडा तुटल्याने व खड्डे पडल्यामुळे
बोर्ली-मांडला : रायगड जिल्ह्यातील साळाव-रेवदंडा खाडीपुलामुळे अलिबाग, मुरु ड व रोहा हे तीन तालुके जवळ आलेत. परंतु पुलाचा कठडा तुटल्याने व खड्डे पडल्यामुळे पुलाची दुरवस्था झाली असून येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या तिन्ही तालुक्यांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
साळाव - रेवदंडा पुलाचे काम १९८६ साली करण्यात आले होते. त्यामुळे अलिबाग, रोहा आणि मुरु ड हे तीन तालुके जवळ आले. या पुलामुळे मुरु ड तालुक्यात आर्थिक, सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. या पुलाच्या निर्मितीनंतर मुरु ड तालुक्याला पर्यटन क्षेत्र म्हणून मान्यता मिळाली. या पुलाच्या निर्मितीपूर्वी मुंबई, पुणे येथे जाण्यासाठी साळाव - चणेरा - रोहा -नागोठणे - मार्गे वडखळ पेण मार्गे खोपोली पुणे किंवा पेण - पनवेल -मुंबई असा प्रवास करावा लागत असे. हा प्रवास त्याकाळी ७ ते ९ तासांचा होत असे.
काही वर्षांपासून अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाकडे दुर्लक्ष केल्याने या पुलाची वाताहत झाली आहे . या पुलाला मे २०१४ मध्ये दुसऱ्यांदा भेग पडली होती. त्यावेळी बांधकाम खात्याने लोखंडी पट्टी लावून त्या ठिकाणी सिमेंट लावले होते. तसेच त्यावेळी पडलेले खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र आता पट्टी लावलेला सिमेंटचा भाग निखळला आहे, पुलाच्या कठड्याचा काही भाग पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)