रुग्णालयातील कंत्राटी परिचारिकांना वेतनाची प्रतीक्षा; मानधन मिळाले नसल्याच्या तक्रारी
By निखिल म्हात्रे | Published: May 13, 2024 05:17 PM2024-05-13T17:17:37+5:302024-05-13T17:19:49+5:30
अलिबागमध्ये परिचारिकांना मानधन वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे.
निखिल म्हात्रे, अलिबाग :अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य सेवाअंतर्गत गेल्या काही वर्षांपासून बंधपत्रिक कंत्राटी परिचारिकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मात्र, या परिचारिकांना मानधन वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. मागील वर्षभरापूर्वी तीन महिन्यांचे मानधन रखडले होते. आता नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली असूनदेखील मार्चमधील त्यांचे मानधन त्यांना मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबाबत संबंधित यंत्रणेला विचारूनदेखील त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर दिले जात नसल्याचेदेखील बोलले जात आहे.
ठाणे येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत परिचारिकांची करारावर भरती करण्यात आली आहे. अकरा महिन्यांच्या करारानुसार परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे ५४ बंधपत्रित कंत्राटी परिचारिका कार्यरत आहेत. या परिचारिकांना दर महिन्याला वीस हजार रुपयांचे मानधन दिले जाते. कंत्राटी परिचारिका कायमस्वरूपी परिचारिकांच्या बरोबरीने काम करतात. शासनाच्या वेगवेगळ्या योजना रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाइकांपर्यंत पोहोचविण्याचे कामदेखील त्या करतात. लसीकरणाच्या अभियनाबरोबरच वेगवेगळ्ळ्या योजनांची जनजागृतीदेखील या परिचारिकांच्या माध्यमातून केली जाते. कायम सेवेत असलेल्या परिचारिकांच्या खाद्याला खांदा लावून बंधपत्रित परिचारिका काम करतात. रात्रीचा दिवस करून आरोग्य सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, निधी शासनाकडून वेळेवर मिळत नसल्याचा त्रास या परिचारिकांना होत आहे.
बंधपत्रित कंत्राटी परिचारिकांना दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मानधन दिले जाते. निधी आल्यावर तातडीने मानधन वेतनाच्या स्वरूपात त्यांच्या खात्यात जमा केले जाते. मार्च महिन्यातील रखडलेले मानधन देण्याचा प्रयत्न केला जाईल.- डॉ. शीतल जोशी, अतिरिक्त शल्यचिकित्सक.