बोर्ली-मांडला : मागील दोन वर्षांपासून साळाव-मुरुड रस्त्यावरील उर्वरित रस्त्याचे काम रेंगाळले होते. याबाबत विविध सामाजिक, राजकीय, ज्येष्ठ नागरिक संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग आदीनी निवेदने देऊन आंदोलन केले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याने याची दखल घेत साळाव-मुरुड रस्त्यावरील उर्वरित रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात केल्याने प्रवासी व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
साळाव-मुरुड रस्त्यावर मागील वर्षापासून अनेक ठिकाणी खाच-खळगे व खड्डे पडले होते. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काही ठिकाणी कोर्लई, बोर्ली, बारशिव, दांडा, नांदगाव, मजगाव-गावठाण, विहूर, मुरुड अशा काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले होते. यंदा पडलेल्या पावसाने उर्वरित रस्त्यावरही खाचखळगे व खड्ड्यांचे प्रमाण वाढले, त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचे हाल होत होते.
या रस्त्यावरील खाचखळगे व खड्डे भरण्यात येऊन रस्त्याच्या डांबरीकरणासाठी विविध राजकीय, सामाजिक, ज्येष्ठ नागरिक संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग आदी मान्यवरांनी निवेदने देऊन आंदोलनही केले होते. याची सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेऊन उर्वरित रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली असून, साळाव-मुरुड रस्त्यावर बोर्ली-भोईघर फाट्यापासून डांबरीकरणास सुरुवात करण्यात आल्याने प्रवासी व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.