पनवेल : तोंडी परवानगी घेऊन एका कार कंपनीने पालिकेच्या मैदानात गाड्यांच्या बुकिंगसाठी दोन दिवस स्टॉल लावले होते. शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष सवलत म्हणून या कॅम्पची पालिकेकडून कोणतीच परवानगी संबंधित कंपनीने घेतली नव्हती. नागरिकांनी या प्रकरणी विरोध दर्शविल्यावर संबंधित कंपनीकडून परवाना फी आकारण्यात आली.
विशेष म्हणजे, सोमवारी एका दिवसासाठी चारचाकी कंपनीला पालिकेच्या मैदानात विशेष कॅम्प लावण्याची परवानगी देण्यात आली होती. ही परवानगी तोंडी असूनही दुसºया दिवशीही सर्रास पालिकेच्या मैदानाची जागा व्यापून संबंधित कार कंपनीचे अधिकारी या ठिकाणी बसले होते. अखेर ही बाब काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या संदर्भात पालिकेत तक्र ार दाखल केल्यानंतर पालिकेत खळबळ उडाली. पालिकेच्या अतिक्र मण विभागाने कंपनीचे काही सामान जप्त केले. यांनतर पाच हजारांची परवाना फी संबंधित कंपनीकडून आकारण्यात आली. मात्र, या सर्व प्रकारात पालिकेचा अनागोंदी कारभार उघड झाला. परवाना नसताना कोणत्या आधारावर संबंधित कारविक्री करणारी कंपनी या ठिकाणी सर्रास कॅम्प लावते? तसेच पालिकेच्या मैदानात अशाप्रकारचे कॅम्प लावता येतात का? हादेखील प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
शासकीय कर्मचाऱयांना कार खरेदीमध्ये २५ ते ३० टक्के सवलत देण्याची नवीन स्कीम असल्याने एका दिवसाच्या तोंडी परवानगीवर या ठिकाणी हे कॅम्प लावण्यात आले होते. मात्र, मंगळवारी दुसरया दिवशीदेखील त्यांनी कॅम्प सुरू ठेवल्याने संबंधितांकडून पाच हजार परवाना फी आकारण्यात आली आहे.-एन. पी. कवटे, परवाना विभाग अधिकारी, पनवेल महापालिका