अडीच वर्षांच्या चिमुरडीने केला साल्हेर किल्ला सर; कोविड योद्ध्यांना अनोखी सलामी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 01:02 AM2020-10-13T01:02:45+5:302020-10-13T06:56:09+5:30
शार्विका म्हात्रेचा सलग दुसऱ्यांदा विक्रम
निखिल म्हात्रे
अलिबाग : मनात जिद्द असेल तर अशक्य गोष्टही साध्य करता येते हे अलिबागमधील लोणारे गावातील अडीच वर्षांची चिमुरडी शार्र्विका म्हात्रे हिने गड सर करीत सिद्ध करून दाखविले आहे. कोविड योद्ध्यांना सलामी देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ला तिने शनिवारी साडेपाच तासांत सर केला. शार्विकाची चढण्याची जिद्द पाहून इतर पर्यटकांनाही किल्ला चढण्याची स्फूर्ती मिळाली. यापूर्वी शार्विका हिने १२ किल्ले सर केले आहेत.
शार्विकाने शनिवार, १० आॅक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र - गुजरात सीमेवरील सुमारे ५,१४१ फूट उंचीवर वसलेला महाराष्ट्रातील सर्वांत उंच किल्ला सर करून सलग दुसऱ्यांदा विक्र म नोंदविला आहे. तिने हा विक्र म कोरोना योद्ध्यांना समर्पित केला आहे. कोरोना विषाणूसारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील डॉक्टर, पत्रकार, पोलीस, सफाई कामगार आणि इतर क्षेत्रातील सर्व कोरोना योद्ध्यांना तिने मानवंदना दिली. महाराष्ट्रातील सर्वांत उंच साल्हेर किल्ल्यावर सर्वांत कमी वयात पाऊल ठेवणारी शार्विका ही एकमेव कन्या ठरली आहे. तिच्या कामगिरीची नोंद सलग दुसºयांदा ‘इंडिया बुक’ आणि ‘आशिया बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये होणार आहे. साल्हेर किल्ला हा चढाईसाठी अत्यंत कठीण मानला जातो. आजूबाजूला कशाचाही आधार नसलेल्या दगडात कोरलेल्या पायºया आणि आभाळाला भिडणारा किल्ला सर करताना भल्याभल्यांची भंबेरी उडते. मात्र या चिमुकलीने हसत-खेळत हा गड सर केला.
सामाजिक संदेश
शार्विकाने या किल्ल्यावर आरोहण करून गडावर तिरंगा आणि भगवा ध्वज फडकावला. तसेच गडावर स्वच्छता आणि व्यसनमुक्तीचे फलक झळकावित समाजाला एक उत्तम असा संदेश दिला. शार्विकाची प्रबळ इच्छाशक्ती असल्यामुळे तिने कलावंतीणीचा सुळका, सागरगड, प्रतापगड, खांदेरी, कुलाबा, रायगड, कोर्लई, रेवदंडा, मुरूड-जंजिरा, पद्मदुर्ग, उंदेरी, कलावंतीण दुर्ग असे १२ किल्ले व गड आई-वडिलांच्या साथीने सर केले आहेत. शार्विकाच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शार्विका गड सर करण्यापूर्वी तिच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. पूर्वतयारी करूनच गड सर करण्यात येतो. गड सर करताना मधमाश्यांपासून बचाव करण्यासाठी मोठी प्लास्टीक पिशवी, जवळच्या पोलीस स्टेशनचा नंबर, दवाखान्याचा नंबर, प्राथमिक औषधे, एक डॉक्टर असे पूर्ण नियोजन करूनच गड सर केला जातो. - जितेन म्हात्रे, शार्विकाचे वडील