लीना पवारच्या जिद्दीला सलाम
By admin | Published: June 20, 2017 06:09 AM2017-06-20T06:09:36+5:302017-06-20T06:09:36+5:30
जिद्द, चिकाटी आणि अपार कष्ट करण्याच्या बरोबरीला पालकांसह शाळेची साथ असेल, तर जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करता येते.
अलिबाग : जिद्द, चिकाटी आणि अपार कष्ट करण्याच्या बरोबरीला पालकांसह शाळेची साथ असेल, तर जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करता येते. हे अलिबाग येथील लीना पवार या विद्यार्थिनीने सार्थ करून दाखवले आहे. दुर्धर आजाराने आजारी असतानाही लीनाने दहावीच्या शालान्त परीक्षेत ९५.२ टक्के गुण मिळवले आहेत. तिच्या या यशावर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतात, तर शिक्षक व शाळा हे मुलांचे दुसरे पालक असतात. हे म्हणणे अलिबागमधील सेंट मेरी शाळेने शब्दश: खरे करून दाखवले आहे. लीना विठ्ठल पवार ही दहावीतील विद्यार्थिनी दुर्धर आजाराने आजारी असताना, सेंट मेरी शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन, शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी लीनाच्या उपचारांसाठी लागणारा लाखो रुपयांचा निधी वर्गणी काढून जमा केलाच; परंतु शिक्षकांनी लीनाच्या घरी जाऊन तिचा अभ्यासक्र मही पुरा केला. त्यामुळे शैक्षणिक वर्षातील निम्मे वर्ष अंथरुणाला खिळून असणाऱ्या लीनाने दहावीच्या परीक्षेत ९५.२ टक्के गुण मिळवून आपल्या शाळेचा विश्वास सार्थ ठरवला आहे.
लीनाच्या आई माधवी धांडे या घटस्फोटित आहेत. त्या एकट्याच राहत असल्याने लीनाच्या स्कोलायसिस या दुर्धर आजारावरील शस्त्रक्रियेसाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च ऐकून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली होती; परंतु सेंट मेरी शाळेच्या मुख्याध्यापक मीना यांनी सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना लीनासाठी मदत निधी उभारण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला पालकांनी प्रतिसाद देत, तब्बल तीन लाख रुपये जमा केले. लीनाचे आॅपरेशन लीलावती हॉस्पिटल मुंबई येथे पार पडले. आॅपरेशननंतर शिक्षकांनी तिच्या घरी जाऊन तिचा अभ्यासक्र म पूर्ण केला. लीनाची आई आणि बहीण श्रावणी तिला दहावीच्या अभ्यासक्र मातील धडे वाचून दाखवत असत. लीनाबरोबरच, तिच्या कुटुंबीयांचे आणि सेंट मेरी शाळा व्यवस्थापनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.