तेलंगे गावात लक्ष्मीबाई आंबेडकर यांची समाधी; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:34 AM2021-01-30T01:34:26+5:302021-01-30T01:34:35+5:30
लक्ष्मीबाई आंबेडकर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावजय आहेत, याची मात्र माहिती नव्हती. यामुळे ही समाधी कालांतराने दुर्लक्षित होत गेली.
दासगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे भाऊ आनंदराव आंबेडकर यांची पत्नी लक्ष्मीबाई आंबेडकर यांची समाधी महाड तालुक्यात तेलंगे गावात आहे. या दुर्लक्षित समाधीचा शोध लागला असून, दुर्लक्षित आणि दुरवस्था झालेल्या या समाधीचे दर्शन मुकुंदराव आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर यांनी नुकतेच घेतले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भाऊ आनंदराव आंबेडकर यांची पत्नी लक्ष्मीबाई आनंदराव आंबेडकर यांची समाधी नुकतीच महाड तालुक्यातील तेलंगे गावात असल्याचे प्रकाशात आले आहे. तेलंगे गावातील खैरे यांच्या जागेत ही समाधी असून, या समाधीची दुरवस्था झाली असून, केवळ नामफलक शिल्लक राहिला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे बंधू आनंदराव आंबेडकर यांची पत्नी लक्ष्मीबाई आंबेडकर यांचे आजोळ तेलंगे बौद्धवाडी असून, याच ठिकाणी त्या वास्तव्यास होत्या, अशी माहिती येथील ग्रामस्थ किशोर खैरे यांनी दिली. २१ एप्रिल, १९४० रोजी तेलंगे गावातच निधन झाले. २१ एप्रिल, १९७६ रोजी तेलंगे येथे त्यांची समाधी उभारण्यात आली. लक्ष्मीबाई आंबेडकर यांची समाधी नामफलकावरून स्थानिक ग्रामस्थांना ज्ञात होती. मात्र, लक्ष्मीबाई आंबेडकर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावजय आहेत, याची मात्र माहिती नव्हती. यामुळे ही समाधी कालांतराने दुर्लक्षित होत गेली.
‘स्मारक उभारणार’
लक्ष्मीबाई आंबेडकर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावजय आहेत, याची मात्र माहिती नव्हती. यामुळे ही समाधी कालांतराने दुर्लक्षित होत गेली. ग्रामस्थांसह मुकुंदराव आंबेडकर, पणतू राजरत्न आंबेडकर, दिलीप आंबेडकर यांनी भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले. या ठिकाणी लवकरच स्मारक उभे केले जाईल, असे राजरत्न आंबेडकर यांनी सांगितल्याचे स्थानिकांनी सांगितले.