'संभाजी ब्रिगेडने तलवारीसह आता लेखणी हातात घ्यावी'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 11:19 PM2018-10-28T23:19:04+5:302018-10-29T06:39:33+5:30
युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे आवाहन; दोन दिवसीय अधिवेशनाची सांगता
अलिबाग : बहुजनांच्या कायम पाठीशी असणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे काम हे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या विचारधारेवर आधारित आहे. देशातील, राज्यातील परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तलवारीसह आता लेखणी घेऊन काम करण्याचे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात दोन दिवस संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन सुरू होते. रविवारी सायंकाळी अधिवेशनाची सांगता झाली. त्यापूर्वी ते बोलत होते. जी संघटना, जो समाज बहुजनांचा विचार करतो, त्यांच्या पाठीशी महाराजांचा आशीर्वाद कायमच राहणार आहे. प्रवीण गायकवाड यांच्या रूपाने बहुजनांचे हित साधणारा नेता संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मिळाला आहे. बहुजन समाजाला एकत्र आणण्याची तळमळ प्रवीण गायकवाड यांच्यामध्ये आहे. संभाजी ब्रिगेडच्या ताकदीचा डंका सर्वदूर वाजला पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
दोन दिवस पार पडलेल्या अधिवेशनातून चांगला विचार घेऊन संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते जातील, परंतु आता खरी त्यांची जबाबदारी वाढली आहे. अधिवेशनात शिकवलेल्या धड्याचा उपयोग त्यांनी सामाजिक कार्यात करणे गरजेचे आहे. त्यामुळे समाजातील सर्व बहुजन समाजाला त्याचा उपयोग होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्यातील गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी स्वत: प्रयत्न करणार असल्याचेही खासदार संभाजी राजे यांनी सांगितले. गड-किल्ल्याचे संवर्धन करताना तेथील गावांचाही विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. सध्याचे राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. युवा शक्ती घडवण्याचे काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सुरू आहे.
संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आधी आर्थिक सक्षम होणे गरजेचे आहे. समाजकारणातून राजकारण करताना दृष्टी प्रगल्भ ठेवावी, असा सल्ला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला. अधिवेशनामध्ये आर्थिक सक्षमीकरण, कृषी उद्योगातील संधी, दहशतवादाचे बदलते स्वरूप, भीमा कोरेगाव दंगल प्रकरण, सनातन संस्था व समाज सुधारकांच्या झालेल्या हत्या, मोर्चा पे चर्चा, मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणापुढील समस्या, समाजकारण, राजकारणातील वर्तमान स्थिती, प्रसार माध्यमे व सोशल मीडियाचे महत्त्व आदी विषयांवर चर्चा झाली. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, रोहित पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, प्रवक्ते श्रीमंत कोकाटे, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शांताराम कुंजीर हे पदाधिकारी उपस्थित होते.