अलिबाग - मुंबईकडून अलिबागला स्पिडबोटने येताना सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि संभाजीराजे बालंबाल बचावले. बोटीच्या अतिवेगामुळे मांडवा जेट्टीजवळ धक्क्याला न थांबता सुमारे ५० फुटपुढे भरकटत जाऊन किनाऱ्यावर आदळली. अकस्मितपणे बसलेल्या या धक्यामुळे ते बोटीतच पडले. सुदैवाने दोघाना कसलीही दुखापत झाली नाही. मात्र स्पीड बोट चालकांचा बेफिकरीपणा चव्हाट्यावर आला आहे.
पालकमंत्री सामंत यांची स्पीड बोटमध्ये अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसापूर्वी त्यांची बोट बंद पडली होती. शिवराज्याभिषेकाचे यंदाचे 350 वे वर्ष आहे राज्य सरकारकडून हा सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. त्याबाबत नियोजन बैठकीसाठी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे ,पालकमंत्री सामंत यांनी जिल्हा प्रशासन व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची अलिबाग येथील मुख्यालयात बैठक बोलावली होती. त्यासाठी दोघे मुंबईतून एका खाजगी कंपनीच्या स्पीड बोटीने अलिबागसाठी रवाना झाले. मांडवा जेट्टीजवळ आले असताना चालकाचे बोटीच्या वेगावरील नियंत्रण सुटून ती समुद्राच्या किनारा असलेल्या दोन खांबावर जाऊन आदळली. तेथून परत मागे येऊन जेट्टीवर थांबविण्यात आली.
या प्रकाराने मंत्री सामंत,संभाजीराजे यांच्या सह बोटीतील अन्य अधिकारी काही क्षणयासाठी भांबावून गेले, किती मोठ्या संकटातून वाचलो, यांची कल्पना करून काहीकाळ सुन्न झाले. त्यांच्या स्वागतासाठी जेट्टीवर आलेले आमदार व अन्य अधिकारीही या अपघाताने आंचबित झाले. सुदैवाने कोणाला फारशी दुखापत न झाल्याने तो विषय बाजूला ठेवीत त सर्वजण अलिबागच्या कार्यक्रमस्थळी रवाना झाले. काही क्षणासाठी स्पिडबोट चालकांचे नियंत्रण सुटल्याने आपण मोठ्या दुर्घटनेपासून आपण वाचलो, असे त्यांनी पत्रकारांना सांगितली. यापुर्वीदेखील पालकमंत्री सामंत यांची बोट काही दिवसापूर्वी भर समुद्रात बंद पडली होती. त्यावेळी दुसर्या बोटीचा आधार घेत त्यांनी किनारा गाठला होता.