महाड - रायगड किल्ल्यावर असणाऱ्या राजसदरेवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी लाखो शिवप्रेमी रायगडावर येत असतात. परंतु या ठिकाणी पुरातत्व विभागाने लावलेले बॅरिकेड्स राजसदरेला शोभनीय नाहीत. त्यामुळे ती तत्काळ काढावीत, अशी मागणी पुरातत्त्व विभागाकडे केली असल्याची माहिती रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.लॉकडाऊननंतर सध्या रायगडावर रायगड संवर्धनाची कामे सुरू झाली आहेत. रायगडावर येणाऱ्या पर्यटकांकडून शुल्क वसूल करण्याकरिता पुरातत्व विभागाने चित्त दरवाजा येथे तिकीट खिडकी उघडली आहे. ही तिकीट खिडकी रायगडाच्या सुशोभीकरणाला बाधा आणणारी आहे. तसेच ती योग्य प्रकारची नसल्याची अनेक तक्रारी शिवप्रेमींनी खासदार संभाजीराजे यांच्याकडे केलेल्या होत्या, त्या तक्रारीदेखील पुरातत्व विभागाचे अधीक्षक राजेंद्र यादव यांच्याकडे पाठवण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. रायगडावर येणाऱ्या शिवप्रेमींना राजसदरेवर जाण्याची इच्छा असते; परंतु याकरिता काही नियम घालून देणे आवश्यक असले तरीही यासाठी अटकाव करू नये, अशी भूमिका ही संभाजीराजे यांनी मांडली. कामे पुन्हा सुरूरायगडावर जाण्यासाठी चित्त दरवाजा तेंव्हा दरवाजापर्यंत हाती घेण्यात आलेली पायऱ्यांची कामे तसेच संरक्षक कठडे यांची कामे पुन्हा सुरू करण्यात आलेली आहेत. चित्त दरवाज्याच्या दर्शनीय भागामध्ये केलेल्या पायऱ्यांच्या कामासाठी चुना, गूळ बेलफळ यांचे मिश्रण वापरले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘राजसदरेजवळील अडथळे दूर करावेत’, संभाजीराजे यांची पुरातत्त्व विभागाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 1:11 AM