रोपवे जागेसंदर्भात संभाजीराजे यांची भूमिका चुकीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:44 PM2020-09-29T23:44:25+5:302020-09-29T23:44:41+5:30
हिरकणीवाडी ग्रामस्थांचे म्हणणे : पत्रकार परिषद घेऊन दिले स्पष्टीकरण
महाड: रोपवेसाठी, जोग कंपनीने जागा खरेदी करताना, कुणाचीही फसवणूक केलेली नाही. या जागेच्या संदर्भात काही लोकांनी घेतलेली भूमिका आणि रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा.संभाजीराजे यांनी केलेले समर्थन चुकीचे आहे, असा आरोप हिरकणीवाडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केला.
रोपवेच्या बस स्टेशनची जागा आमच्या मालकीची असल्याचा दावा हिरकणीवाडी येथील एका औकिरकर कुटुंबाने केला असून, रोपवे बंद केला आहे. खा.संभाजीराजे यांनी या कुटुंबाचे समर्थन करीत, त्यांना न्याय मिळवून देण्याची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर हिरकणीवाडी येथील लक्ष्मण औकिरकर आणि अन्य ग्रमस्थांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. जे औकिरकर कुटुंब, रोपवेची जागा मालकीची असल्याचा आणि जोग कंपनीने त्यावर बेकायदेशीर कब्जा केल्याचा दावा करीत आहे, तो दावा खरा नाही. ही जागा लक्ष्मीबाई औकिरकर यांच्या मालकीची असून, त्यांनीच ती जोग कंपनीला विकली असल्याचा दावा, लक्ष्मण औकिरकर आणि ग्रमस्थांनी केला. जागेची शासकीय मोजणी झाल्यानंतर खरे काय ते स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
खा.संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. आमच्यासाठी त्यांनी खूप काही केले आहे. मात्र, या वादात दोन्ही बाजू समजावून घेत, त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करायला हवा, असे औकिरकर म्हणाले.
रोपवे सुरक्षित
च्रोपवेचे कर्मचारी परशुराम उमरठकर यांनी हा रोपवे धोकादायक असल्याचा खा.संभाजी राजे यांचा आरोप खोडून काढला.
हा रोप अत्यंत सुरक्षित असून, रोपवे कार्यरत झाल्यापासून आजपर्यंत एकही दुर्घटना घडलेली नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेची सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.