- मधुकर ठाकूर
उरण : एमआयडीसीच्या पाईप लाईनचे नुकसान तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली खटल्यातून चिर्ले गावातील रहिवासी समीर पाटील यांची जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संतोष शिंदे यांनी तीन वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली आहे. उरण तालुक्यातील दास्तान फाटा ते दिघोडे येथील वेश्वी ( दादरपाडा) बस स्टॉप जवळील एमआयडीसीच्या पाईप लाईनला अज्ञात ट्रेलर वाहनाने धडक दिल्याची घटना घडली होती. या घटने संदर्भात ट्रेलर मालक व चिर्ले गावातील रहिवासी समीर पाटील यांच्या विरोधात एमआयडीसीच्या पाईप लाईनचे नुकसान तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे आदी आरोपाचा ठपका ठेवून उरण पोलीस ठाण्यात १९ ऑगस्ट २०१९ रोजी भा. दं. वि. कलम ३५३च्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी पनवेल येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात मागील तीन वर्षांपासून दाखल झालेल्या खटल्याची सुनावणी सुरू होती. सुनावणीनंतर पनवेल येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड संतोष शिंदे यांच्या न्यायालयाने समीर पाटील यांची गुन्ह्यातून मंगळवारी (२०) निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी तर्फे जेष्ठ वकील अॅड. प्रमोद ठाकूर व अॅड किशोर पाटील यांनी काम पाहिले.