उरण (मधुकर ठाकूर) : विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणाऱ्या सामवेद लॉजिस्टिक या गोदामाला सोमवारी (८) दुपारी आग लागली. या भीषण आगीत गोदाम जळून खाक झाले आहे. सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांचे तीन बंबाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण सुरू आहेत. हजरडस्ट केमिकलचा साठा ठेवण्यात आला असल्याने आग लागली असल्याचे सांगितले जात आहे.
उरण परिसरात वन, सिडको, महसूल विभागाच्या आशिर्वादाने अनेक अनधिकृत गोदामे अनधिकृतपणे उभारण्यात आली आहेत. अशा अनधिकृत गोदामापैकीच सामवेदा लॉजिस्टिक एक गोदाम भाडेतत्वावर चालविण्यासाठी घेण्यात आले आहे.
या गोदामाला सोमवारी (८) दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत स्टेशनरी, खेळणी आदी सामानाबरोबरच काही प्रमाणात हजरडस्ट रसायनाचा साठा छुप्या पद्धतीने ठेवण्यात आला होता. गोदामात बेकायदेशीरपणे ठेवण्यात आलेल्या हजरडस्ट रसायनाच्या साठ्यालाच आग लागली आणि गोदामच आगीत भस्मसात झाले असल्याचे शेजाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
तसेच गोदाम उच्च दाबाच्या वीज वाहनांच्या खाली उभारण्यात आले आहे. खबर मिळताच आग विझविण्यासाठी सिडकोच्या अग्नीशमन दलाचे तीन बंब दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांचे मोठ्या शर्थीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आग विझविण्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे. या भीषण आगीत मात्र गोदाम बेचिराख झाले आहे.
अद्यापही गोदामाला आगीने वेढले आहे. आगीची माहिती अग्निशमनदलाला दिली परंतु अग्निशमन यंत्रणा वेळेवर पोहोचू शकली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सामवेद लॉजिस्टीकचे व्यवस्थापकीय संचालक उमेद्र कतरे यांनी दिली. गोदामात अग्निशमन यंत्रणा नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे माल हाताळणी करणाऱ्या गोदामाला परवानगीच कशी व कुणी दिली याबाबत नागरिकांतुन उलटसुलट चर्चा सुरू आहे.