पनवेलमधील गटई कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:23 PM2018-10-28T23:23:42+5:302018-10-28T23:24:17+5:30
पनवेल महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत पालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे स्टॉल्स जमीनदोस्त करण्यात येत आहेत.
पनवेल : पनवेल महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत पालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे स्टॉल्स जमीनदोस्त करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईत चर्मकार संघाच्या गटई कामगारांच्या स्टॉल्सवरही कारवाई करण्यात आल्याने संतप्त गटई कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण २७६ अधिकृत गटई कामगार आहेत. शुक्र वारी खारघर येथे झालेल्या पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत दोन गटई कामगारांच्या स्टॉल्सवरही अतिक्र मण विरोधी पथकाने कारवाई केली. विशेष म्हणजे, शासनाच्या धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेने सर्व्हे करून गटई कामगारांसाठी बसण्याची जागा निश्चित करावी. असे असताना पालिकेने गटई कामगारांवरील कारवाई केल्याने गटई कामगार संतप्त झाले आहेत. गटई कामगारांसंदर्भात धोरण ठरवण्याचे काम सुरू असताना अशाप्रकारे त्यांच्या स्टॉल्सवर कारवाई करणे योग्य नव्हे, यापूर्वी पालिकेचे माजी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी अतिक्रमण मोहिमेवेळी गटई कामगारांवर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे पनवेल महानगरपालिकेने गटई कामगारांचे धोरण ठरवून लवकरच अधिकृत जागा उपलब्ध करून देण्याची मागणी या वेळी गटई कामगार युनियनचे अध्यक्ष शिवदास कांबळे यांनी केली.