धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:49 PM2019-06-19T23:49:06+5:302019-06-19T23:50:06+5:30
कोकणसाठी सीआरझेड क्षेत्रातील अटी शिथिल; १०० कोटींच्या निधीसह आणखीही निधी उपलब्ध होणार
मुरुड जंजिरा : कोकणातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे अनेक वर्षांपासून रखडली आहेत. समुद्राच्या भरतीरेषेपासून जवळ असणारी भात शेती टिकवून ठेवण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारे आवश्यक आहेत. परंतु सद्यस्थितीतील बंधारे कालबाह्य ठरल्याने समुद्राचे पाणी शेतात घुसून हजारो हेक्टर शेतजमीन नापीक होऊ लागली आहे. याबाबत शेतकºयांनी अनेकदा आवाजही उठवला आहे.
शासनाकडून धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यास निधी दिला जात नव्हता. शिवाय सीआरझेडचे कारण देत येथे धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यात येत नव्हते. अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार पंडित पाटील यासंदर्भात दोन वर्षांपासून विधासभेत प्रश्न उपस्थित करीत होते. शासनाला सीआरझेडचे निर्बंध शिथिल करण्याची मागणी त्यांनी केली होती. अखेर शासनाने धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्याला मंजुरी दिल्याने संपूर्ण कोकणाला दिलासा मिळाला आहे.
अलिबाग तालुक्यातील मांडवा येथील समुद्र किनारी संरक्षक बंधाºयाचे भूमिपूजन नुकतेच पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधाºयाची गरज आहे. मात्र सीआरझेड कायद्यामुळे अनेक कामे रखडली होती. आता शासनाने सीआरझेड क्षेत्रात काम करण्याची परवानगी दिल्याने संपूर्ण कोकणाला फायदा मिळणार आहे.
याबाबत माहिती देताना आमदार पंडित पाटील म्हणाले, सीआरझेडच्या बंधनामुळे धूपप्रतिबंधक बंधारे बांधता येत नव्हते. त्यामुळे हजारो हेक्टर शेती नापीक होत होती. धूपप्रतिबंधक बंधाºयांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर होऊन सुद्धा तो खर्ची पडत नव्हता. याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष सुद्धा वेधले होते. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडेही याबाबत चर्चा केली.
धूपप्रतिबंधक बंधाºयांसाठी उपलब्ध शंभर कोटींचा निधी खर्च करता येणार आहे. शिवाय आवश्यकता वाटल्यास आणखी निधी सुद्धा प्राप्त करता येणार आहे. उपलब्ध शंभर कोटींचा निधी हा कोकणातील तीन जिल्ह्यात खर्च होणार आहे. बंधाºयामुळे शेतीचे संरक्षण होईल.
- पंडित पाटील, आमदार, मुरुड