म्हसळा तालुक्यातील संदेरी धरणाला दुरु स्तीअभावी गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:03 AM2020-07-25T00:03:10+5:302020-07-25T00:03:10+5:30
भिंतींवर वाढली झुडपे; संबंधितांचे दुर्लक्ष
म्हसळा : तालुक्यातील १९८०च्या दशकातील संदेरी धरण दुरुस्तीअभावी शुक्रवारी अखेरची घटका मोजत आहे. धरणाच्या दुरुस्तीबाबत कोणतीही पावले उचलली नसल्याने गाळसिंचन करण्याचे काम हाती न घेतल्याने आज धरणाच्या काही भागांत गळती लागली आहे.
यंदाच्या पावसात सरासरी धरणाचा ७० टक्के भाग पाण्याने भरला असून, हे धरण दुथडी भरून वाहत आहे. धरणाच्या मुख्य पायथ्याशी मजबुतीकरिता असलेल्या भिंतींवरही अनेक झुडपांनी तग धरला आहे. भविष्यात या भिंतींना धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. ५०० ते १००० घरांची वस्ती असलेल्या संदेरी गावची वस्ती धरणाच्या एक किमी अंतरावर असल्याने जर का धरण फुटले, तर ही गावे पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धरणाजवळ असलेल्या कामगारांसाठी असलेल्या घरांचीही नासधूस होऊन ही जागा पडिक झाल्याने येथे कोणताही कर्मचारी सद्यस्थितीत फिरकताना दिसत नाही. त्यामुळे धरणाजवळील क्षेत्राला पडक्या वाड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खाडीपट्टा विभागातील आंबेत, संदेरी, फळसप या तीन ग्रामपंचायतींच्या गावांना या धरणाचा पाणीपुरवठा होत असून, अद्याप कोणत्याही ग्रामपंचायतींकडून दुरुस्तीबाबत पाठपुरावा केला नाही.
आंबेत खाडीपट्टा विभागातील असलेले संदेरी धरण हे आज अखेरची घटका मोजत असताना, या विभागातील आंबेत, संदेरी व फळसप या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढाकाराने या धरणाचे दुरुस्तीच्या, तसेच इतर समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या बाबींकडे लक्ष घालून हे काम मार्गी लावणे गरजेचे आहे, परंतु ग्रामपंचायतीकडून पाहिजे ते सहकार्य मिळत नाही आणि याचा फटका नागरिकांवर बसत आहे.
- मुकेश आंबेकर, नागरिक