महसूलने जप्त केलेल्या साठ्यातून वाळूचोरी
By admin | Published: December 6, 2015 12:15 AM2015-12-06T00:15:26+5:302015-12-06T00:15:26+5:30
रॉयल्टी संपली तरी अनधिकृत वाळूसाठा सापडल्याप्रकरणी महाड तहसीलदार यांच्याकडून सापे तर्फे गोविर्ले प्लॉटधारकांवर कारवाई करीत हजारो ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती.
दासगांव : रॉयल्टी संपली तरी अनधिकृत वाळूसाठा सापडल्याप्रकरणी महाड तहसीलदार यांच्याकडून सापे तर्फे गोविर्ले प्लॉटधारकांवर कारवाई करीत हजारो ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती.
त्यातील सात प्लॉटधारकांनी जप्त केलेल्या वाळूमधून काही ब्रास वाळू चोरी केल्याची तक्रार महाडचे मंडल अधिकारी संजय माने यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार सात प्लॉटधारकांवर वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावित्री खाडीत २०१३-१४ मध्ये हातपाटी वाळू उत्खननाची मुदत ८ जून २०१४ रोजी संपली होती. मुदत संपली असतानाही ३४६, ३०४, २२६, २२७, ३७२ या प्लॉटधारकांच्या प्लॉटवर २,११४ ब्रास वाळूचा अनधिकृत साठा सापडला होता. हा साठा महाड महसूल विभागाने जप्त केला होता. महाड तहसील कार्यालयाकडून १३ जुलै २००७ रोजी जप्त वाळूसाठ्याची पाहणी करण्यात आली. यावेळी सात प्लॉटधारकांच्या जप्त केलेल्या वाळूसाठ्यातून ८५९ ब्रास वाळू कमी सापडली.
वाळू चोरीप्रकरणी प्लॉटधारक सुफियान इरफान (रा. मुंबई), अबजार फजल काझी (रा. तुडील), अखलाक हसन हसवारे (रा. आंबेत), विनोद शहा (रा. मुंबई), सादिक रहीमद्दीन अनवारे (रा. दासगांव), जनार्दन भोईर (रा. पेण), संतोष सावंत सापे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुलैत जप्त वाळूसाठ्याची पाहणी केली, मात्र सर्व कागदपत्रे महाड तहसील कार्यालयात असल्याने मंडल अधिकारी गुन्हा दाखल करू शकले नाहीत. यामुळे त्यांनी कार्यालयाकडे अर्ज केल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आल्याने त्यास विलंब लागला.
- संदीप कदम, तहसीलदार, महाड.