सत्संगातून स्वच्छता अभियान; प्रेम, शांती आणि समतेचा दिला संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 02:18 AM2017-10-06T02:18:55+5:302017-10-06T02:20:57+5:30
संत निरंकारी यांनी जगाला प्रेम, शांती आणि समतेचा संदेश दिला. सध्या समाजामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा यांसारखी मानवी मूल्ये ढासळत चालली आहेत.
गिरीश गोरेगावकर
माणगाव : संत निरंकारी यांनी जगाला प्रेम, शांती आणि समतेचा संदेश दिला. सध्या समाजामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा यांसारखी मानवी मूल्ये ढासळत चालली आहेत. या मानवी मूल्यांना बळकटी देण्यासाठी १९२९मध्ये संत निरंकारी मंडळाची स्थापना झाली. आरोग्यास घातक असणाºया अस्वच्छता आणि कचरा या समस्येच्या निर्मूलनाकरिता संत निरंकारी मंडळ गेली अनेक वर्षे भारतातच नव्हे, तर जगभरातील इतर २८ देशांमध्ये अध्यात्मिक शिकवणीतून स्वच्छतेचा नारा देत आहे. याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, वृक्षलागवड असे विविध उपक्रम राबवित आहेत. मंडळाचे भक्तगणही अनेक उपक्रम आपापल्या तालुका शाखेतून संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून करीत असतात.
माणगाव तालुक्यात तालुका मुखी राम टेंबे, प्रचारक अनिल पवार, पारुनाथ मुंडे यांनी स्वच्छतेवर भर देत संपूर्ण तालुक्यात स्वच्छता अभियान राबवून अनेक गावे कचरामुक्त केली आहेत. सार्वजनिक ठिकाणे बस स्टॅण्ड, रेल्वे स्थानक, रस्ते, वाड्या-वस्त्या येथे वेळोवेळी स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात येते. तालुक्यात स्वच्छतेची कामे करण्याकरिता तालुका शाखेकडून प्रत्येक गावात भक्तगणांचे सेवादल स्थापन करण्यात आले आहे. या सेवादलाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान नियमित राबविण्यात येते.
२६३ शहरी रेल्वेस्थानकांची नियमित स्वच्छता
देशभरात एकूण २६३ शहरी रेल्वेस्थानके नियमितपणे स्वच्छ केली जातात. यामध्ये प्लॅटफॉर्म, मुख्य प्रवेशद्वार, वाहतूक तळ, तिकीटघर, स्वच्छतागृह यांचा समावेश आहे. याला अनुसरून माणगाव रेल्वेस्थानकही नियमित स्वच्छ करण्याचे नियोजनही मंडळाच्या माणगाव तालुका शाखेने केले आहे.