‘सूर्याजी पिसाळांना रस्त्यावर फिरू देणार नाही’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 11:40 AM2022-06-29T11:40:34+5:302022-06-29T11:41:58+5:30
बंडखोरीचा करेक्ट कार्यक्रम करायचा असून, आता हे बैल बदलण्याची आणि फटके देण्याची वेळ आली आहे.
अलिबाग : राज्यात शिवसेना संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. रायगड हा शूरांचा आणि निष्ठावंतांचा जिल्हा असून येथील तीन आमदार गद्दार निघाले. त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा गर्भित इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अलिबागमध्ये दिला. अलिबागमध्ये भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये मंगळवारी शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते.
बंडखोरीचा करेक्ट कार्यक्रम करायचा असून, आता हे बैल बदलण्याची आणि फटके देण्याची वेळ आली आहे. गद्दारांनी पाठीत खंजीर खुपसला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ताकद देऊन पुन्हा वर्षावर पाठवायचे आहे, असा निर्धार खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांसमोर व्यक्त केला आहे. खासदार राऊत यांनी आणि माजी खासदार अनंत गीते यांनी बंडखोर आमदार यांच्यावर सडकून टीका केली असून गद्दारांना क्षमा नाही. चुकीला माफी नाही. काही झाले तरी झुकणार नाही, असा पवित्रा राऊत यांनी घेतला आहे. अलिबागचे बंडखोर आमदार हे अनेक पक्ष फिरून आले आहेत. त्यामुळे या बैलाला आता बदलण्याची वेळ आली असल्याची टीकाही राऊत यांनी केली आहे.
शिवसेनेच्या बंडखोरीने रायगडातील शिवसेना सांभाळण्यासाठी अनंत गीते सरसावले असून, पुढचे राजकारण मी ठरवणार, असा निर्धार अनंत गीते यांनी केला आहे.
भरत गोगावलेंवर टीका
खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदार भरत गोगावले यांचा ‘पादवले’ असा उल्लेख केला, तर अनंत गीते यांनी गोगावले हे महाडचे भूत ते बाटलीत बंद करू, अशी टीका केली.
निष्ठावान शिवसैनिकांची गर्दी
शिवसेनेच्या मंगळवारी अलिबाग येथे झालेल्या मेळाव्याला हजारो शिवसैनिकांनी हजेरी लावली होती.